दरम्यान शंभर महिला ज्येष्ठ शिवसैनिकांचा होणार सन्मान
सावंतवाडी,दि.०३: गणेशोत्सवाचे औचित्य साधत सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य दिव्य अशी ‘खेळ फुगडीचा’ ही स्पर्धा दिनांक १४ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ “पै” सभागृहात आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेचा जिल्ह्यातील महिला-भगिनींनी आनंद घ्यावा आणि आपला गणेशोत्सवाचा आनंद साजरा करावा, असे प्रतिपादन उबाठा सेनेच्या सावंतवाडी शहर संघटीका श्रुतिका दळवी यांनी केले आहे.
आज सावंतवाडी येथील उबाठा शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी नेमळे गावाच्या सरपंच दीपिका बहिरे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष नम्रता झरापकर, सावंतवाडी तालुका उपसंघटक रूपाली चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक रश्मी माळवदे, कल्पना शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना श्रुतिका दळवी यांनी सांगितले की, महिला नेहमी घरातच असतात. मात्र त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने येत्या १४ सप्टेंबर रोजी महिलांसाठी भव्य दिव्य अशा खेळ फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यात प्रथम येणाऱ्या बारा संघांना आपले कलागुण सादर करण्याची संधी देण्यात येईल.
स्पर्धेत आहेत भरगच्च बक्षिसे –
दरम्यान या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तब्बल ११,१११/ रुपये आणि सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व साडी,
द्वितीय पारितोषिक रुपये रोख ७, ७७७/,
आणि तृतीय पारितोषिक रोख रक्कम ५,५५५/ व प्रत्येक स्पर्धकाला साडी व प्रमाणपत्र, असे स्वरूप असेल.
*ज्येष्ठ १०० महिला शिवसैनिकांचाही होणार सन्मान -*
‘खेळ फुगडीच्या’ स्पर्धेच्या निमित्ताने ज्येष्ठ १०० महिला शिवसैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या लाडक्या महिला शिवसैनिकांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार असल्याचे श्रुतिका दळवी यांनी सांगितले.
तरी या स्पर्धेत महिलांनी सहभागी होवून बक्षिसांची लयलूट करावी, असे आवाहन उबाठा सेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी शहर संघटक श्रुतिका दळवी आणि तमाम उबाठा शिवसैनिकांनी केले आहे.