रत्नागिरीतील आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेत राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजचे वर्चस्व..

0
31

सलग दुसऱ्या वर्षी पटकावला सांघिक चषक, अदिती राजाध्यक्ष राज्यात अव्वल

रत्नागिरी,दि.२०: अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीचा वारसा लाभलेल्या रत्नागिरीच्या पावन भूमीत पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस आणि गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत कॉलेजने सलग दुसऱ्या वर्षी ‘सांघिक चषक’ आपल्या नावावर करून यशाची परंपरा कायम राखली आहे.

प. पू. श्री स्वामी स्वरूपानंद यांनी अभंग ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आध्यात्मिक संतपद प्राप्त केले होते, तसेच महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्या सोबत स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभाग घेतला होता. अशा या महान संतांच्या पावन स्मृतींना अभिवादन करत १५ डिसेंबर २०२५ रोजी गोगटे जोगळेकर कॉलेज येथे ही स्पर्धा पार पडली. राज्यभरातील अनेक निष्णात वक्त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असतानाही, राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी अदिती अवधूत राजाध्यक्ष हिने आपल्या ओघवत्या वाङशैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ७००० रुपये रोख आणि प्रमाणपत्र प्राप्त केले.

या स्पर्धेसाठी कॉलेजचा तीन विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता, ज्यामध्ये अदिती राजाध्यक्षसह कुमारी रेश्मा संदेश पालव आणि कुमार चिन्मय शांताराम असनकर यांचा समावेश होता. या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर कॉलेजला मानाचा सांघिक चषक मिळवून दिला. या यशात त्यांना मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती महाश्वेता कुबल आणि स्मिता खानोलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या सोहळ्यासाठी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह ऋषीकेश पटवर्धन, विश्वस्त डॉ. राजेंद्र जोशी, प्रा. मकरंद साखळकर आणि प्रा. गोसावी यांसारखे विचारवंत व लेखक उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण अमृता नरसाळे आणि सोनाली खेडेकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, सचिव व्ही. बी. नाईक सर आणि खजिनदार सी. एल. नाईक सर यांनी विशेष कौतुक केले. तसेच मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर मॅडम, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक मॅडम आणि कॉलेजच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here