माजगावचा सिद्धेश आरपीडी कॉलेजचा विद्यार्थी
सावंतवाडी,दि.०५: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूलच्या पार्किंग परिसरात सापडलेले १३०० रुपये माजगाव येथील कु सिद्धेश गुरुनाथ घाडी याने प्रशालेचे मुख्याध्यापक एस व्ही भुरे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे समाजात आजही प्रामाणिकपणाचे मूल्य जोपासले जाते याची प्रचिती सिद्धेश घाडी याने दाखवून दिल्याने त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या या दहावीची परीक्षा सुरू असून आर पी डी कॉलेज चा बारावीतील विद्यार्थी कु सिद्धेश घाडी आपल्या देवेंद्र मुकुंद घाडी या भावाला कळसुलकर हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला शाळेच्या पार्किंग भागात १३०० रुपयाची रोख रक्कम सापडली. त्यानंतर त्याने ही रक्कम कळसुलकर हायस्कूलमध्ये जमा केली. त्यामुळे सिद्धेशच्या या प्रामाणिकपणाचे संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष कौतुक केले.
सिद्धेश घाडी हा माजगाव येथील वृत्तपत्र वितरक तथा पशुवैद्यकीय कर्मचारी गुरुनाथ घाडी यांचा मुलगा असून सिद्धेशच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.