भारतीय किसान संघ जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सिंधुदुर्गनगरी,दि.०४: भारतीय किसान संघ, सिंधुदुर्ग च्या वतीने वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या उपद्रवाच्या विरोधात आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी साहाय्यक वनरक्षक श्री शिंदे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडे, गवारेडा,डुक्कर, शेकरू, नीलगाय, मोर, सांबर, साळिंदर, हत्ती या प्राण्यांनी दिलेल्या त्रासामुळे हतबल झालेले ५०० शेतकरी यावेळी उपस्थित होते. शेती, शेतमाल व शेतकरी हे भययुक्त जीवन जगत आहे. या सर्व घटकांना भय मुक्त शेती व्हावी ही मागणी यावेळी करण्यात आली.
वन्य प्राण्यांनी शेती व शेतकरी यांच्यावर केलेल्या हल्ल्यची साधी दखलही वनविभाग घेत नाही हे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणले.
यावेळी खालील मागण्या करण्यात आल्या.
१)राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ कलम ३१अन्वये अनुसूची ३ ग नुसार शेती व शेतमालाचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात याव्यात
१) वन्यप्राणी वनविभागाच्या हद्दीत सुरक्षित राहतील अशी आवश्यक सर्व प्रकारची उपायोजना वनविभाग व शासनाने करावी.
२) कोकण व मुख्यत: सिंधुदुर्ग जिल्हा याचा भौगोलिकदृष्ट्या वेगळा विचार करून त्यानुसार नियमात बदल करण्यात यावेत.
३) शेतमाल संरक्षणाचा अधिकार लक्षात घेऊन व्यक्तिगत मालकीच्या शेतीक्षेत्रात कोणताही वन्य प्राणी आल्यास त्याचा कोणत्याही प्रकारे बंदोबस्त करण्याचा सर्वाधिकार शेतकऱ्यांना देण्यात यावा. अशावेळी त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ नये.
४) वानर,माकड, शेकरू, गवारेडा, सांबर, हत्ती,मोर यासारख्या वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानी ची तक्रार करण्यासाठी पिक विमा योजनेच्या धरतीवर टोल फ्री क्रमांक उपलब्ध करावा. तसेच नुकसानग्रस्त शेतीचे जीपीएस (GPS) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्वरित वनविभाग व शेती विभागाने पंचनामा करावा. त्याचा होणारा सर्व खर्च वनविभाग व शासनाने करावा. ७२ तासांच्या आत पंचनामा न झाल्यास शेतकऱ्याने नमूद केलेले नुकसान ग्राह्य धरून सदर शेतमालाच्या बाजार भावाच्या दुप्पट नुकसान भरपाई द्यावी. सध्याची दिली जाणारी नुकसान भरपाई ही अत्यंत तुटपुंजी आहे. यासाठी त्यामध्ये वरील प्रमाणे योग्य वाढ करावी. तसेच होणाऱ्या नुकसानीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर ठराविक मुदतीत जमा करावा.
याचबरोबर गवा रेड्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या जॅकी आल्मेडा यांना वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, उपाध्यक्ष सूर्यकांत कुंभार, प्रांत कार्यकारणी सदस्य प्रमोद लांगी(रायगड), जिल्हा मंत्री अभय भिडे,कोशाध्यक्ष मिलिंद पंत वालावलकर, महिला प्रमुख स्वाती पिंगुळकर व रसिका पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकृष्ण धुरी, विश्वास सावंत,प्रविण परब, तालुका अध्यक्ष जयराम परब,युवराज ठाकूर, पांडुरंग हळदणकर,सखाराम नाईक, अंकिता सावंत उपस्थित होते.