शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याने विज्ञान पदवीधारकांची गणित विज्ञान विषय पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती

0
56

सिंधुदुर्ग,दि.०६: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गच्या सततच्या पाठपुराव्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ इच्छुक विज्ञान विषय पदवीधारकांपैकी ११ विज्ञान विषय पदवीधारक शिक्षकांना गणित-विज्ञान पदवीधर शिक्षक म्हणून मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी पदोन्नत्ती देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये विज्ञान विषयाच्या पदवीधरांच्या ४९५ एकूण पदांपैकी १६४ पदे भरलेली असून ३३१ पदे रिक्त होती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या काही शिक्षकांनी बीएससी पदवी प्राप्त केलेली होती. शासन आदेशनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी साठी विज्ञान पदवीधर म्हणून अशा कार्यरत शिक्षकांमधून विज्ञान विषय शिक्षक म्हणून पदोन्नती दयावी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागास वारंवार भेट घेऊन सदरची बाब महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग संघटना निदर्शनास आणत होती.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्गतर्फे बीएससी पदवीधर पदोन्नतीसाठी पहिले लाक्षणिक धरणे आंदोलन दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी केले. सदरची आंदोलनाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभागाने विज्ञान शाखेतील पदवीधर शिक्षकांची तात्पुरती यादी जा.क्र. सिंजिप/शिक्षण/आस्था / ४२१४/२०२४, दिनांक २१/०२/२०२४ नुसार पत्राने प्रसिद्ध केली. तात्पुरत्या प्रसिध्द यादीवर हरकत मुदत संपल्यानंतर शिक्षण विभागाने अंतिम यादी सिंजिप / शिक्षण/आस्था/४२१४/२०२४, दिनांक ०८ मार्च २०२४ नुसार प्रसिद्ध केली होती. परंतु सदर शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही. म्हणून सदर शिक्षकांच्या होणाऱ्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक शाखा सिंधुदुर्गतर्फे दिनांक ११ मार्च २०२४ आणि दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी असे दोन वेळा शिक्षण विभाग सिंधुदुर्गला पत्र देऊन रखडलेली बीएससी पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी याचे पुनः स्मरण करून देण्यात आले. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन शिक्षण सेवक भरतीपूर्वी पदवीधर पदोन्नती पदस्थापना दयावी अशी विनंती केली.
याबाबत जिल्हा शिक्षण प्रशासनाने असे आश्वासित केले होते की, तुमच्यावर कोणताही अन्याय न करता भरतीपूर्वी पदोन्नती प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतरही जिल्हा शिक्षण प्रशासनाने पदोन्नती पदस्थापना प्रक्रिया न राबविल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्गतर्फे पुन्हा एकदा बीएससी पदवीधर पदोन्नतीसाठी दुसरे लाक्षणिक धरणे आंदोलन दिनांक १० जून २०२३ रोजी केले. याकडे प्रशासनाने अक्षरशः पाठ फिरवली होती.
याबाबत शिक्षक परिषदेचे राज्यध्यक्ष राजेश सुर्वे यांनी ११ जून २०२४ रोजी शिक्षक संचालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर विषयाबाबत निवेदन देऊन चर्चा केली. तसेच शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनीही ११ जून २०२४ रोजी संचालकांशी पत्रव्यवहार केला. या सर्व पत्रांच्या मागणीचा विचार करून जिल्हा परिषदांमध्ये विज्ञान / गणित विषयाचे शिक्षक पदे रिक्त आहेत. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी आधारे जिल्हा परिषदांतर्गत पदभरतीपुर्वी सद्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत सेवाजेष्ठ शिक्षकांमधून गुणवत्तेनुसार इयत्ता ६ वी व इयत्ता ८ वी करीता विज्ञान/गणित या विषय शिक्षकांसाठी रिक्त पदांच्या मर्यादेत पदोन्नतीची प्रक्रिया आपल्या स्तरावरून शासन नियमानुसार राबविण्यात यावी असे आदेश शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे आदेशीत केले होते. त्यानंतर प्रशासनाने उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून अंतिम सेवाजेष्ठता यादीतील ११ शिक्षकांना गणित-विज्ञान पदवीधर शिक्षकपदी पदोन्नती देण्यात आली.
यानंतर सदर पदोन्नती झालेल्या शिक्षकांना एस १४ वेतनश्रेणी मिळवून देणे, जुलै २०२४ नंतर विज्ञान पदवी प्राप्त शिक्षकांची पदोन्नती करणे, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या भाषा पदवीधर जागांवर भाषा पदवी प्राप्त शिक्षकांची पदोन्नती करण्याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी सांगितले.
पहिल्या लाक्षणिक धरणे आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग, कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग या सर्व संघटनांचे शिक्षक परिषदेमार्फत आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here