गेळे ग्रामस्थांच्या उपोषणाला मा.नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा पाठिंबा

0
48

सिंधुदुर्गनगरी, दि.२५ : गेळे गावच्या कबुलायतदार गांवकर प्रश्ना संदर्भात शासन निर्णय होऊनही जिल्हाधिकारी जागा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत. या विरोधात माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आमरण उपोषण छेडले आहे. या उपोषणाला सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपस्थिती दर्शवित पाठिंबा जाहीर केला.

यावेळी संजू परब म्हणाले, जनतेच्या न्याय हक्कासाठी संदीप गावडे आमरण उपोषणाला बसले आहेत. आंबोली, गेळे जमीन प्रश्न अनेक वर्षे ऐकतोय. अनेक नेते आश्वासन देत आहेत पण, काम होत नाही आहे. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मागे हटू नये. संदीप गावडे यांच्या उपोषणाला निश्चित यश येईल असा विश्वास सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. तर संदेश पारकर म्हणाले, गेळे ग्रामस्थांच्या जमीनी या हक्काच्या आहेत. त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळायलाच पाहिजे. ग्रामस्थांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे असं मत श्री. पारकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप मंडळ अध्यक्ष रविंद्र मडगावकर, माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, उपसरपंच विजय गवस, तुकाराम बंड, देवसू सरपंच रूपेश सावंत, श्रीकृष्ण गवस आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here