प्रकाश कानुरकर यांना राज्यस्तरीय “शिक्षणव्रती” पुरस्कार प्रदान..

0
29

कट्टा,दि.१७ : भ. रा.नाईक प्रतिष्ठान सांगली, मार्फत राज्यस्तरीय “शिक्षणव्रती” शिक्षक पुरस्कार वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा चे सहायक शिक्षक प्रकाश विठोबा कानुरकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, फेटा,शाल, श्रीफळ आणि दहा हजार रुपये रोख देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार स्वतःच्या कार्यक्षेत्रात म्हणजे आपल्या विद्यालयात विद्यार्थ्यांसमोर प्रदान करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही प्रेरणा आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.

माधवनगरच्या भ. रा. नाईक सरांनी सांगली शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य केले. कृतिशील मूल्यशिक्षणावर त्यांचा भर होता. महाराष्ट्र शासनाचा “आदर्श शिक्षक” हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. १९८७ साली ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. शिक्षक हा त्यांचा पेशा नव्हता तर ते अंगीकृत व्रत होते. मूल्यवान माणूस घडवण्याचा ध्यास त्यांच्या विचारांना, कृतीला, शिक्षणविषयक प्रयोगांना आणि जीवनाला अखंड व्यापून राहिला होता.

सौ. चारुशीला नाईक या नाईक सरांच्या अनेक विद्यार्थ्यांची गुरुमाता! अल्पकाळ त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले. बालपणातून मिळालेलं संस्कृत आणि संस्कृतीविषयक प्रेम सततच्या अध्ययनातून त्यांनी ताजं ठेवलं. त्यांच्या कविमनाचा संवाद नाईक सरांच्या ज्ञानचिंतनाशी होत राहिला, हाच त्या उभयतांचा संसार होता.

या दांपत्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही, त्यांच्या परिवारातील सदस्य, २०२२ पासून “शिक्षणव्रती” हा पुरस्कार देत आहोत. महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात समरसून कार्य करणाऱ्या, विद्यादानात प्रयोगशील असलेल्या आणि मुख्यतः या दांपत्याच्या शैक्षणिक विचारांशी साम्य असलेल्या शिक्षकाला पुरस्कार द्यावा असे आम्हांला वाटले. या निमित्ताने पुरस्कारार्थी शिक्षकाच्या कार्याची नोंद घ्यावी आणि यथोचित कौतुक व्हावे ज्यायोगे त्या शिक्षकाच्या भावी कार्यास शुभेच्छा मिळतील असे या पुरस्काराचे प्रयोजन आहे.

पुरस्कार समारंभात प्रमुख अतिथी डॉ. नितीन देशपांडे, सौ. राधालक्ष्मी देशपांडे, डॉ. प्रज्ञा अंजळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्थेचे सचिव सुनील नाईक,सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, खजिनदार शाम पावसकर, सहसचिव साबाजी गावडे, संचालक महेश वाईरकर, केंद्रप्रमुख सावंत, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नाईक, इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक ऋषी नाईक व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मिराशी तसेच गुणवंत विद्यार्थी, पालक व सहकारी शिक्षक उपस्थित होते.

पुरस्कार समारंभात प्रमुख अतिथींनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. नितीन देशपांडे यांनी आपल्या भाषणात श्री कानुरकर यांच्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली आणि त्यांनी केलेल्या योगदानाची माहिती दिली. सौ. राधालक्ष्मी देशपांडे यांनी शिक्षण क्षेत्रातील महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि त्यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. प्रज्ञा अंजळ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गोष्टी सांगून त्यांना अधिक प्रोत्साहित केले.

या पुरस्काराचे विशेष म्हणजे राज्यातील निवडक शिक्षकांची मुलाखत घेऊन त्यांची निवड केली जाते. या प्रक्रियेमुळे शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन अधिक सखोलतेने केले जाते आणि योग्य शिक्षकांचा सन्मान केला जातो.

या पुरस्काराबद्दल संस्थेचे विश्वस्त मा.कर्नल शिवानंद वराडकर, एस. एन. पवार यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
प्रकाश कानुरकर यांच्या कार्याची नोंद घेत त्यांचे यथोचित कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अजयराज वराडकर यांनी “प्रयोगशील व विद्यार्थीप्रिय शिक्षकांचा गौरव आमच्या संस्थेत झाला याबद्दल मला अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढले.

संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी या विशेष प्रसंगी शिक्षकांचा गौरव बघून आपला अभिमान व्यक्त केला. शिक्षकांनी आपले अनुभव आणि विचार विद्यार्थ्यांसोबत शेअर केले, ज्यामुळे कार्यक्रम अधिकच आनंददायी ठरला.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व कट्टा पंचक्रोशीतील पालकांनी व शिक्षण प्रेमींनी कानुरकर सरांचे खूप कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here