सावंतवाडी येथे आयोजित योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
सावंतवाडी,दि.२२ : आपल्या दैनंदिन जीवनात योग क्रियेचे अत्यंत महत्त्व असून प्रत्येकाने दैनंदिन जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढावा. योग क्रिया समजून घेत शास्त्रीय पद्धतीने योग केल्यास आपले आयुष्य निरामय राहते आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभते. त्यामुळे प्रत्येकाने योग करावाचं, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी येथे आयोजित तीन दिवसीय योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, पतंजली योग समिती आणि वैश्य समाज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील वैश्य भवन सभागृहात तीन दिवसीय मोफत योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, डीजीटल मीडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, वैश्य समाजाचे अध्यक्ष रमेश बोंद्रे, पतंजली परिवाराचे महेश भाट, बाळासाहेब बोर्डेकर, योग प्रशिक्षक विकास गोवेकर, दत्तात्रय निखार्गे, भरत गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, प्रा. रुपेश पाटील, उमेश सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर, नरेंद्र देशपांडे, विनायक गांवस, निखिल माळकर, साबाजी परब, भुवन नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सावंतवाडी येथील ज्येष्ठ विधीज्ज्ञ तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले आपल्या धकाधकीच्या जीवनात आज अनेक लोकं कंटाळलेले आहेत. मात्र आपले शरीर तंदुरुस्त राहावे यासाठी योग किंवा व्यायाम करणे अपरिहार्य आहे. आपली पचनसंस्था योग्य राहिली तर सगळ्या शरीराला फायदा होतो. त्यामुळे आपण नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. सावंतवाडी वैश्य समाजाचे अध्यक्ष रमेश बोंद्रे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्याला अनेकदा ताणतणाव येतो. हा ताणतणाव कमी करण्यासाठी योगसाधना महत्त्वाची आहे. म्हणून सावंतवाडीत आयोजित तीन दिवसीय योग शिबिराचा सावंतवाडी शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा व आपल्या आयुष्य निरामय करावे, असेही श्री. बोंद्रे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले.