सावंतवाडी,दि.२०: कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेने निस्वार्थी वृत्तीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी अनेक उपक्रम राबविले. याच सामाजिक बांधिलकीतून प्रतिष्ठानने या कारागृहाच्या अनेक विभागांच्या रंगरंगोटीसाठी रंग उपलब्ध करून दिल्याने या कारागृहाचे रूप पालटून या कारागृहाला झळाळी प्राप्त झाली आहे. कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारागृहातील तुरुंग अधिकारी संजय मयेकर, इतर कर्मचारी आणि कारागृहातील बंदीवानांनी कारागृहाच्या या सुशोभीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारागृहाचे पुरुष व महिला बंदीवानांचे बॅरेक आतून तसेच बाहेर, स्वयंपाकगृह सांस्कृतिक हॉल, गार्ड रूम यांची रंगरंगोटी करण्याची आवश्यकता होती. सिंधुमित्र प्रतिष्ठान या कारागृहात अनेक उपक्रम राबवत असताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांना या कारागृहाच्या रंगरंगोटी करण्याबाबत प्रकर्षाने जाणीव झाली. त्यांनी याबाबत कारागृहाचे अधीक्षक संदीप एकशिंगे यांच्याकडे या कारागृहाच्या रंगरंगोटीसाठी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने
रंग उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कारागृहाच्या मागणीनुसार
कारागृह परिसराच्या रंगकामासाठी लागलेला रंग सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने या कारागृहाला भेट स्वरूपात देण्यात आला.
सिंधुमित्र प्रतिष्ठानने दिलेल्या रंगातून कारागृहातील पुरुष व महिला बंदीवानांचे बॅरेक आतून तसेच बाहेर, स्वयंपाकगृह सांस्कृतिक हॉल, गार्ड रूम, मुख्य प्रवेशद्वार परिसराची रंगरंगोटी करण्यात आली. विशेष म्हणजे या कारागृहातील बंदीवानांसह कर्मचारी व अधिकारी वर्गाने कारागृहाच्या या अनेक विभागांची रंगरंगोटी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत या कारागृहाचे सुशोभीकरण केले. या कारागृहातील छोटेखानी पाटेकर देवालयाची रंगरंगोटी करून ते आकर्षक सजविण्यात आले.
कारागृहाच्या या सुशोभीकरणामुळे चारभिंती आतील हे कारागृहाचा हा परिसर प्रसन्न आणि आनंददायी बनला आहे.
सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कौतुक!
कारागृहाच्या आतील अनेक विभागाच्या रंगरंगोटीसाठी रंग उपलब्ध करून दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक संदीप एकशींगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून बंदीवानांच्या हितासाठी आवश्यक त्या नियमानुसार देय असलेल्या वस्तूंचा मोफत पुरवठा तसेच अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात.
या रंगरंगोटीसह सजावटीमुळे कारागृहाच्या अनेक विभागांना जळाली प्राप्त झाली. तसेच या रंगरंगोटीसह सजावटीमुळे कारागृहाच्या आतील विभागांचे वातावरण प्रसन्न व आनंददायी बनल्याचे सांगून बंदीवानांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले. तुरुंगाधिकारी संजय मयेकर यांनी कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांतर्गत या कारागृहाच्या आतील विभागांच्या रंगरंगोटीसाठी सहकार्य केल्याबद्दल सिंधुमित्र प्रतिष्ठानचे त्यांनी आभार मानले.
या अभिनव उपक्रमाबाबत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे म्हणाले, सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू – भगिनींसाठी अनेक राबविले आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही देण्यासह सुमारे अडीज वर्षे प्रत्येक मंगळवारी प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. तसेच व्याख्याने आयोजनासह महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप, आवश्यक साहित्य वाटप, योग दिन, आरोग्य शिबीर आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात सुमारे ४ महिने प्रत्येक रविवारी बंदिवान बंधुकरिता प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे येत डॉ ठाकरे यांनी सांगितले.