सावंतवाडीत उद्यापासून भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार….

0
62

सावंतवाडी,दि.०८: तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवार पासून तीन दिवस भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे. उद्घाटनाच्या प्रारंभी भंडारी बांधव व खेळाडूंची बाजारपेठेतून भव्य रॅली निघणार आहे. शिरोडा नाका येथून रॅलीला प्रारंभ होणार असून जिमखाना मैदानावर रॅली विसावणार आहे.शिवसेना नेते किरण सामंत ही या रॅलीत सहभागी होणार आहेत. रॅलीनंतर भव्य उद्घाटनाचा सोहळा होऊन प्रत्यक्ष स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून स्पर्धेसाठी भंडारी मंडळ सज्ज झाले आहे. स्पर्धा यशस्वितेसाठी भंडारी मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते मेहेनत घेत आहेत. दुपारी मंडळाच्या पदाधिकऱ्यानी मैदानाची पाहणी करुन स्पर्धेचा आढावा घेतला.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलाही या स्पर्धेचा आस्वाद घेणार आहेत. महिलांसाठी खास कक्ष उभारला असून महिलांसाठी अचूक विजेता ओळखा, ही स्पर्धाही आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या महिलेला पैठणी देण्यात येणार आहे.
८ व ९ रोजी तालुकास्तरीय तर रविवारी जिल्हास्तरिय स्पर्धा होणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत आठ तालुका भंडारी मंडळाचे संघ सहभागी झाले आहेत. तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये तर उपविजेत्या संघाला ११ हजार रुपये देण्यात येणार आहे. जिल्हास्तर स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रुपये तर उपविजेत्याला १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी संघाकडून कोणतीही प्रवेश फी घेतली जाणार नाही. सर्व संघाना भंडारी मंडळाकडून जर्सी देण्यात येणार आहे. तिन्ही दिवस सर्वांची भोजनाची व्यवस्था मंडळाकडून कऱण्यात आली आहे.भंडारी युवा शक्तीला व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे व युवा शक्ती मजबूत करावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here