सावंतवाडी दि.८ : ‘एक मराठा लाख मराठा.!’, ‘जय भवानी, जय शिवाजी.!’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.!’ अशा जोरदार घोषणांनी सावंतवाडीचा मोती तलाव परिसर आणि संपूर्ण सावंतवाडी शहर आज दुमदुमून निघाले. मराठा समाजाला आरक्षण आणि समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाने मोटरसायकल रॅली काढून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री यांच्यासाठी निवेदन दिले. सुमारे अडीच ते तीन हजार मराठा समाज बांधवांनी मोटरसायकल रॅली मध्ये सहभाग घेतला होता.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आंदोलन छेडले त्याला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे आज मोटार सायकल रॅली काढून मराठा आरक्षणाची आर्त हाक आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी मराठा समाज बांधव सावंतवाडीत एकवटले होते.
प्रारंभी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा येथे श्री देव पाटेकर यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून सकल मराठा समाजाच्या बाईक रॅलीला सुरुवात झाली. याशिवाय युवराज लखमराजे यांच्या हस्ते श्रीमंत बापूसाहेब महाराज, श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्यास तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सावंतवाडी राजवाडा येथे या रॅलीत सहभागी झालेले सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, ज्येष्ठ नेते विकास सावंत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला नेत्या सौ अर्चना घारे- परब, सकल मराठा सावंतवाडी तालुकाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, अशोक दळवी, पुंडलिक दळवी, रूपेश राऊळ, अभिषेक सावंत, विशाल सावंत,पूजा दळवी, सौ.अपर्णा कोठावळे,सौ भारती मोरे, अमोल सावंत, सतिश बागवे,सुधीर राऊळ, राजू तावडे अशा मराठा समाजातील सर्व पक्षातील नेत्यांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला.
बाईक रॅलीने वेधले लक्ष
सावंतवाडी शहरात दाखल झालेले सावंतवाडी तालुक्यातील मराठा बांधव आपापल्या मोटरसायकली घेऊन त्यावर भगवा ध्वज लावून ‘जय भवानी, जय शिवाजी.!’, ‘एक मराठा, लाख मराठा.!” अशा घोषणा देत होते. सावंतवाडीचा मोती तलाव परिसर आणि त्यानंतर थेट सावंतवाडी तहसीलदार कार्यालय या परिसरात मराठा बांधव दाखल झाले. आपल्या मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीबाबत त्यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना आपले निवेदन सादर केले. या बाईक रॅलीने उपस्थितांचे लक्ष तर वेधलेच शिवाय शासनाचे देखील लक्ष वेधले आहे. अत्यंत शांत, संयमी व शिस्तबद्धपणे ही रॅली पार पडली. त्याबद्दल सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांनी सर्वांचे आभार मानले व हीच एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही केले.
रात्रभर पाऊस तरीही मराठा समाज बांधवांचा उत्साह कमालीचा होता.
दरम्यान, काल रात्री पासूनच सुरु झालेल्या पावसामुळे आज सकाळी झालेल्या आयोजित केलेल्या रॅलीत मराठा समाज बांधव कशा प्रमाणात सहभागी होतील?, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र सह्याद्रीच्या दर्या – खोऱ्यातून आपल्या मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आणि मराठ्यांची आरक्षणाची मागणी जोरदारपणे लावून धरण्यासाठी आणि विशेषतः प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तमाम मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सावंतवाडीत आपल्या मोटर सायकली घेऊन दाखल झाले. सळसळत्या पावसाच्या सरींसह मराठ्यांची जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण सावंतवाडी शहर न्हावून निघाले होते.
दरम्यान या रॅलीत सहभागी झालेल्या आणि सावंतवाडी तालुक्यातील वाडीवस्तीतून आलेल्या मराठा समाजातील महिला भगिनी यांचे सुद्धा प्रमाण चांगले होते आणि त्यांनी कमालीचा उत्साह दाखवत मराठा समाजाची एकजूट आणि त्यासाठी महिला रणरागिणींचा असलेला उत्साह हा निश्चितच अचंबित करणारे आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, युवराज लखन राजे भोसले, ज्येष्ठ नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला नेत्या अर्चना घारे, अशोक दळवी, पुंडलिक ,प्रमोद सावंत, रुपेश राऊळ, रेवती राणे, दिगंबर नाईक, अभिषेक सावंत, लक्ष्मण नाईक, डॉ.प्रवीणकुमार ठाकरे, सतीश बागवे, अमोल सावंत, सुधीर मल्हार, विलास सावंत, संदीप सावंत, बाळू सावंत, सूर्या पालव, नितीन राऊत, नारायण राणे, विनोद गावकर, अभिलाष देसाई ,मंगेश बिले, विनायक सावंत, मनोज घाटकर, दीपक शिर्के, आत्माराम गावकर, रवींद्र गावकर,विशाल सावंत, शिवदत्त घोगळे , धोंडी दळवी,नारायण जाधव, विनायक दळवी, सोनु दळवी, आकाश मिसाळ, भूषण सावंत, उमेश गावकर, राघोजी सावंत, जयप्रकाश सावंत, राजेंद्र म्हापसेकर ,चंद्रोजी सावंत, खेमराज कुडतरकर, चंद्रकांत राणे, अभिजीत सावंत, प्रल्हाद तावडे, आनंद गवस, नंदू विचारे, प्रसाद राऊळ, रवींद्र गावकर , दीपक गावकर,सौ साक्षी कुडतरकर,सौ संयुक्ता गावडे, सौ भारती मोरे,सौ अपर्णा कोठावळे, सौ दिपाली सावंत,सौ सुचिता गावडे,सौ नीलिमा चलवाडी , सुरेश सावंत, संदीप राणे,सौ पूजा दळवी सौ सुचिता गावडे, सुर्या पालव, विनोद गावकर , अभिजीत टिळवे तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातून मोटरसायकल दुचाकीवरून आलेल्या बांधवांनी एकत्रित एकजुटीने रॅलीत सहभाग घेतला होता.
सावंतवाडी राजवाडा, तीन मुशी, आर पी डी हायस्कूल रोड, श्रीमंत बापूसाहेब महाराज पुतळा, चितारआळी, गांधी चौक, ते शिरोडा नाका व तहसीलदार कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढून तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देण्यात आले.