छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी,दि.०१: छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी अनेक गोष्टींतून जाणवते. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे महाराजांनी जाणून आरमाराची उभारणी केली. ४ डिसेंबर रेाजी नौदल दिनाचे औचित्य साधून राजकोट किल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असल्याने या किल्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सर्वांनी पुढच्या पिढीला द्यावा असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ३२ गड किल्ल्यांतील गोळा करण्यात आलेली माती एकत्र करुन शिवपुतळा उभारणीच्या स्थळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या ‘माती कलश’ रॅलीचा शुभारंभ देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी भव्य दिव्य स्वरुपात हा सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन काम करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी श्री तावडे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटन वाढीच्या दृष्टीने नवनवीन प्रकल्प तसेच उपक्रम राबवून जिल्ह्याचा विकास साधणार असेही ते म्हणाले.