सावंतवाडी, दि. ०३ : शासनाने नगरपालिका, ग्रामपंचायत घरपट्टीमध्ये वृक्ष व शिक्षण कराप्रमाणे वार्षिक दोनशे रुपये विमा कर आकारणी केल्यास संबंधित विमा कंपनीकडून नुकसान झालेल्या इमारत, दुकान मालक, कुटुंबियांना पाच लाखाची भरपाई मिळू शकते. त्यामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. यासाठी शासनाने पावसाळी अधिवेशनात व मंत्रिमंडळात शासन निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अतिवृष्टी, महापूर, भूकंप, दरडी कोसळणे, झाडे कोसळणे, घरात पाणी घुसून नुकसान होणे, विद्युत शॉर्टसर्किट अशा अनेक नैसर्गिक आपत्ती होऊन घर, इमारती, दुकानांची नुकसानी होते. त्यात काहीजणांचा मृत्यू होतो. अशा कुटुंबियांना शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई तुटपुंजी मिळत आहे. जर शासनाने घरपट्टीमध्ये शिक्षण व वृक्ष कराप्रमाणे विमा कर आकारावा. किमान दोनशे रुपये विमा कर घरपट्टीमध्ये आकारल्यास संबंधित विविध विमा कंपनीकडून नुकसानग्रस्तांना पाच लाखाचे विमा कवच मिळणार आहे. शासनाने निवेदनाचा गांभीर्याने विचार करून व नैसर्गिक आपत्तीत मोठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी घरपट्टीत २०० रुपये विमा कर आकारणी करावी. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देऊन लक्ष वेधले.