सावंतवाडी पत्रकार संघ, व अर्चना फाउंडेशनचा पुढाकार
सावंतवाडी,दि.२८ : येथील बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे येथे तेरेखोल नदीतील पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या सरमळे,ओठवणे व विलवडे येथील ७ युवकांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सरमळे आमराई येथे सन्मान करण्यात आला. सात युवकांनी जीवाची बाजी लावून केलेलं कार्य कौतुकास्पद आहे. ‘अतिथी देवो भव’ ही आपली संस्कृती या संकंटात देवदूत बनत या युवकांनी जपली आहे. शासनाने त्यांची दखल घेणं गरजेचं होतं. परंतू, बाळशास्त्रींचा आदर्श ठेवून कार्यरत असणारे पत्रकार त्यांच्या मागे उभे राहीले. त्या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. अशा कोकणातील पत्रकारांचा आम्हाला अभिमान आहे असं मत अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.


सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि अर्चना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सरमळे येथे तेरेखोल नदीतील पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या या ७ धाडसी युवकांचा सन्मान करण्यात आला. संजय सावंत, विश्वजीत गावडे, संजय गावडे, रजत देसाई, अक्षय तळवडेकर (सर्व सरमळे), एकनाथ दळवी (विलवडे),संजय गावकर (ओटवणे) या सात युवकांनी बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्यातून पर्यटकांसह दोन वाहनांना बाहेर काढले. त्यांच्या या कर्तुत्वाचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे स्वरूप मांडले. यावेळी धाडसी युवकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना त्या प्रसंगाचा थरार कथन केला. यावेळी तालुका पत्रकार संघाच्यावतीने फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांचा सत्कार करण्यात आला.



आमच्या गावच्या ७ धाडसी युवकांमुळे सात जणांचे जीव वाचले. पत्रकार, अर्चना फाउंडेशनन त्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर थाप मारली. शासनाने दखल घेतली नाही त्यांना आता जाग येईल, त्यांची दखल शासन घेईल असं मत उपसरपंच दिपांकर गावडे यांनी व्यक्त केल. फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब म्हणाल्या, सात युवकांनी कौतुकास्पद काम केलं. जीवाची बाजी लावून त्यांनी लोकांना वाचवल. अतिवृष्टीत कोकणातील हे युवक घेत असलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. अतिथी देवो भव अशी आपली संस्कृती आहे. आज या संकंटात देवदूत म्हणून ह्या युवकांनी धावत जात ती संस्कृती जपली.या युवकांच आणि त्यांच्या कुटुंबीयांच कौतुक करावं तेवढं कमी आहे. बाळशास्त्रींचा आदर्श ठेवून पत्रकार कार्यरत आहेत. समाजाच्या मागे ते उभे राहत आहेत. कोकणातील पत्रकारांचा आम्हाला अभिमान आहे असं मत व्यक्त केले. अर्चना फाउंडेशन सामाजिक कार्यात सोबत राहील असा शब्द त्यांनी दिला.
अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक म्हणाले, निधड्या छातीच्या तरुणांच्या सन्मानाचा कार्यक्रम हा मोठाच असतो. संकटं काळात जो धावून येतो तो आपला असतो. गेल्या काही वर्षांत कोकणात मोठ्या आपत्ती निर्माण होत आहेत. अशी परिस्थिती कोकणात या आदी नव्हती. अशा प्रसंगी जे मदतीला धावून जातात ते देवदूतच आहेत. प्रत्येक गावात अशी लोक असतात. अशा लोकांची निवड करुन आपत्ती व्यवस्थापन कक्षात त्यांना सामावून घेतलं पाहिजे. प्रशिक्षण देत साधन सामुग्री उपलब्ध करून द्याव्यात यासाठी पत्रकार संघ म्हणून आम्ही प्रयत्न करू असं मत श्री.नाईक यांनी व्यक्त केल.
याप्रसंगी अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन नाईक,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपांकर गावडे, माजी उपसरपंच समीर माधव, ग्रामपंचायत सदस्य राजन कांबळे, एकता दळवी, नाना काटाळे, भजनी बुवा संजय गावडे, विजय गावडे, अजित दळवी, पत्रकार संघाचे सचिव मयुर चराठकर, उपाध्यक्ष दीपक गांवकर, सहसचिव विनायक गांवस, सदस्य राजू तावडे, मंगल कमत, नरेंद्र देशपांडे, मोहन जाधव, सचिन रेडकर,रूपेश हिराप, निलेश परब, शैलेश मयेकर, आनंद धोंड, साबाजी परब, रामदास पारकर, भुवन नाईक, अर्चना फाउंडेशनचे वैभव परब, आकाश पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.