सिंधुदुर्गात ‘आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ची यशस्वी सुरुवात..! पहिले बाळ जन्मले!

0
32

यशराज हॉस्पिटल आणि ‘आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ मध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वंध्यत्वग्रस्त जोडप्यांसाठी एक नवीन आशेचा किरण

सावंतवाडी,दि.०७: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंध्यत्वग्रस्त जोडप्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. सावंतवाडी येथील यशराज हॉस्पिटल आणि ‘आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ मध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्या बाळाचा यशस्वी जन्म झाला आहे. २५ नोव्हेंबर रोजी सिझेरियन ऑपरेशनद्वारे एका गोंडस मुलीचा जन्म झाला, ज्यामुळे कोकण आणि आसपासच्या भागातील वंध्यत्वग्रस्त जोडप्यांसाठी एक नवीन आशेचा किरण निर्माण झाला आहे.

या संपूर्ण उपचारादरम्यान आधुनिक ICSI (इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या यशस्वी उपचारांमुळे, आता कोकणवासीयांना महागड्या उपचारांसाठी मुंबई, गोवा किंवा पुणे येथे जाण्याची गरज भासणार नाही, कारण त्यांच्या हक्काचे आणि बजेटमध्ये बसणारे अत्याधुनिक वंध्यत्व निवारण केंद्र त्यांच्या दारात उभे राहिले आहे.

या अत्यंत महत्त्वाच्या आणि यशस्वी IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) प्रक्रियेमध्ये एका विशेषज्ञ डॉक्टरांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. यशस्वी उपचारांसाठी IVF तज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर, भूलतज्ज्ञ डॉ. मुक्तानंद गवंडळकर, एम्ब्रयॉलॉजिस्ट कपिल राईतूरकर आणि “आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर” सावंतवाडीचा संपूर्ण स्टाफ यांचे अथक प्रयत्न आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले.

यावेळी बोलताना प्रसिद्ध स्त्रीरोग, वंध्यत्व आणि IVF तज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांनी परमेश्वराचे आणि सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले, “ज्यांच्या आयुष्यात बाळ नाही, अशा असंख्य जोडप्यांना हे “आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर” एका आशेचा किरण बनून उभे राहिले आहे. यशराज हॉस्पिटलच्या या सेंटरची टॅग लाईन “डॉक्टर मला आई व्हायचंय” हेच आमच्या रुग्णांप्रति असलेल्या दृढतेचे प्रतीक आहे.”

‘आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ची आणखी एक खासियत म्हणजे, हे केंद्र अत्याधुनिक सोयींनी आणि जर्मन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या सेंटरमध्ये IVF आणि ICSI साठी लागणारी युरोपीय मशिनरी उपलब्ध आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग, गोवा, बेळगावी, रत्नागिरी, कोल्हापूर आणि मुंबईमधील कोकणवासीयांना त्यांच्या बजेटमध्ये बसणारे टेस्ट ट्यूब बेबीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार उपलब्ध झाले आहेत.

डॉ. नवांगुळ यांनी या प्रसंगी वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त असलेल्या सर्व जोडप्यांना आवाहन केले आहे की, हे अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे आणि त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. ‘आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’च्या या पहिल्या यशस्वी प्रसूतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, अनेक कुटुंबांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here