नागरिकांना वेठीस धरणे अयोग्य; माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा साळगावकरांवर निशाणा

0
79

सावंतवाडी, दि. १८: “सफाई कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळालीच पाहिजे, या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी नेहमीच कामगारांच्या पाठीशी आहे. मात्र, काम बंद आंदोलन करून शहरातील ४० हजार करदात्या नागरिकांना वेठीस धरणे पूर्णपणे चुकीचे आहे,” असे परखड मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले आहे. या आंदोलनाद्वारे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि त्यांचे काही सहकारी शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा गंभीर आरोपही परब यांनी केला.

सावंतवाडीतील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील सफाई कामगारांच्या काम बंद आंदोलनावर भूमिका स्पष्ट करताना परब म्हणाले, “कामगारांना त्यांचे हक्क कायदेशीर मार्गाने लढून मिळवता येतात. त्यासाठी शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे योग्य नाही. नगरपरिषदेचे कर्तव्य नागरिकांना सेवा देणे हे देखील आहे.”

परब यांनी बबन साळगावकर यांच्यावर टीका करत म्हटले की, “जनतेने नाकारलेले काही नेते या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहेत. कामगारांचा पगार कोणाच्या फोनमुळे काढण्यात आला, याची आधी माहिती घ्यावी,” असा सल्लाही त्यांनी नाव न घेता दिला.

ठेकेदाराच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, “कामगारांची ६५ लाखांची थकबाकी ठेकेदाराने द्यावी हे योग्यच आहे. जरी मुख्य ठेकेदार बाहेरचे असले तरी, स्थानिक पोट-ठेकेदारच काम पाहतात. त्यांना स्थानिक कामगारांची व्यथा कळायला हवी. जर ठेकेदार अन्याय करत असेल, तर ज्याप्रमाणे आमच्या नेत्यांच्या मध्यस्थीने थकित पगार अदा करायला लावला, त्याचप्रमाणे भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,” असा विश्वासही संजू परब यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here