झोळंबेत विशेष ग्रामसभा उत्साहात; ‘समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ

0
47

दोडामार्ग,दि.१७ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने झोळंबे ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आज (दि. १७) ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. या सभेला दोडामार्ग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच सौ. विशाखा नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. उपसरपंच विनायक गाडगीळ आणि ग्रामसेवक नामदेव परब यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ग्रामसभा निरीक्षक नितीन आरोंदेकर यांनी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या योजनेची सविस्तर रूपरेषा मांडली आणि त्यातील ग्रामस्थांच्या सहभागाचे महत्त्व पटवून दिले.

गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनात, झोळंबे ग्रामपंचायतीने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. हीच परंपरा कायम ठेवत याही अभियानात ग्रामस्थांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी ग्रामसेवक नामदेव परब यांनी अभियानाची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर अंगणवाडी परिसराची स्वच्छता करून अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या ग्रामसभेला आरोग्यसेविका मीरा कुरुडे, सीएचओ निकीता नाईक, आशासेविका सुप्रिया गवस, आरोग्यसेवक जेरॉन सोच, तलाठी श्रीराज सांभारे, पोलीस पाटील संजय गवस, शिक्षक संतोष गवस यांच्यासह विविध शासकीय संस्थांचे प्रमुख आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपसरपंच विनायक गाडगीळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here