वेंगुर्ला, (दि. २०): गणेश नाईक लिखित ‘वेंगुर्ल्यातील गडकिल्ले’ आणि ‘शिव दिनविशेष’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन येथील श्री स्वयंभू मंगल कार्यालय, मठ येथे मान्यवरांच्या हस्ते झाले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर आणि वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कै. रायासाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यानिमित्त हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पुस्तकांविषयी माहिती
‘वेंगुर्ल्यातील गडकिल्ले’: हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिले असून यात वेंगुर्ल्यातील यशवंतगड, निवती किल्ला आणि वेंगुर्लेकोट (डच वखार) या परिचित किल्ल्यांची माहिती आहे. त्याचबरोबर, काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या होडावडे चावडी (होडावडे कोट) आणि सध्या अस्तित्वात नसलेल्या कर्ली किल्ल्याचीही माहिती यात दिली आहे. होडावडे येथील चंद्रकांत, राजा आणि श्रीधर दळवी यांनी या किल्ल्याला पुन्हा प्रकाशात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. दळवी समाज आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रयत्नातून या किल्ल्याचे संवर्धन कार्य सुरू आहे.
‘शिव दिनविशेष’: छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी आणि प्रेरणादायी जीवन नव्या पिढीला सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. यात महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा ‘दिनविशेष’ पद्धतीने समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आजच्या डिजिटल युगातील वाचकांना लक्षात घेऊन प्रत्येक दिनविशेषासोबत QR कोड देण्यात आला आहे, ज्याद्वारे वाचक त्या घटनेचे फोटो, व्हिडिओ आणि संदर्भ लिंक्स पाहून अधिक सखोल माहिती मिळवू शकतील.
या प्रकाशन सोहळ्याला तुळस बीट शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, मठ ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली नाईक, शाळेचे मुख्याध्यापक अजित तांबे, सहायक शिक्षक प्रतिमा साटेलकर, पांडुरंग चिंदरकर यांच्यासह पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




