सावंतवाडी,दि.३१: सावंतवाडी आगारातून सोनुर्ली गावासाठी सकाळी ९.१५ वाजता सुटणारी एसटी बस वेळेत सोडण्यात यावी, अशी मागणी सोनुर्लीचे उपसरपंच भरत गावकर यांनी एका निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे केली आहे. या वेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडळ अध्यक्ष सचिन बिर्जे उपस्थित होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून ही बस अनियमितपणे सुटत असल्यामुळे सोनुर्ली गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. या संदर्भात एसटी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे गावकर यांनी पुन्हा एकदा आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले.
निवेदनात म्हटले आहे की, ही बस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वीप्रमाणेच ही बस वेळेवर सोडावी. एसटी महामंडळाने या बसच्या मार्गात बदल केल्यामुळे ती इतर गावांतून उशिरा येते आणि त्यामुळे सोनुर्लीसाठी उशिरा सोडली जाते. याचा त्रास विद्यार्थी आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. जर प्रशासनाने यावर लवकरच तोडगा काढला नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.



