सावंतवाडी,दि.२: आरोंदा-मळेवाड रस्त्यावरील केरकरवाडी येथे काल दुपारी चिंचेची एक भलीमोठी फांदी अचानक रस्त्यावर कोसळली. याचवेळी या मार्गावरून जाणाऱ्या एका दुचाकीवर ही फांदी पडल्याने दुचाकीस्वार दादा पालयेकर (गोवा, पालये) हे गंभीर जखमी झाले. सुदैवाने, मोठा अनर्थ टळला आणि दादा पालयेकर थोडक्यात बचावले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत फांदीखाली अडकलेल्या दादा पालयेकर यांना बाहेर काढले. स्थानिक डॉ. गणपत टोपले यांनी घटनास्थळी येऊन जखमीवर तातडीने उपचार केले. या दुर्घटनेत दुचाकीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
झाडाची फांदी रस्त्याच्या मधोमध पडल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, ग्रामस्थांनी तत्परता दाखवत पडलेली फांदी कापून बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.
या घटनेमुळे सावंतवाडी, शिरोडा, आरोंदा आणि सातार्डा या मार्गांवर रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने अशी धोकादायक झाडे तात्काळ तोडावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.