सावंतवाडी,दि.२: तालुक्यातील मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतीने ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे’ या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रत्येकी एक कचराकुंडी ( डस्टबिन ) वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
सरपंच सौ. मिलन विनायक पार्सेकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या १५व्या वित्त आयोगातून स्वच्छतेसाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तो उघड्यावर टाकणे टाळल्यास गाव अधिक स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, वाटप केलेल्या डस्टबिनचा योग्य वापर करून कचरा उघड्यावर टाकू नये, तसेच त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास सहकार्य करावे.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट, सौ. सानिका शेवडे, सौ. गिरीजा मुळीक, मधुकर जाधव, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, पोलीस पाटील राजाराम मुळीक, तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट, गावातील सीआरपी आशा, अंगणवाडी सेविका, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष ग्रामसभेचे सचिव म्हणून राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका सौ. वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गावातील स्वच्छतेच्या पातळीत सुधारणा होऊन आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल अशी आशा आहे.