सावंतवाडी,दि.३१: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स-सर्व्हिसमेन असोसिएशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली या निवासी सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार देण्यासाठी अत्याधुनिक चपाती मेकिंग मशीन बसवण्यात आली आहे. या मशीनचे उद्घाटन शाळेच्या कार्याध्यक्षांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाच्या वेळी ताजी व गरमागरम चपाती मिळावी, या उद्देशाने ही अत्याधुनिक ऑटोमॅटिक मशीन खास गुजरातहून मागवण्यात आली आहे. या मशीनमुळे एका तासात तब्बल एक हजार चपात्या बनवता येतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय अधिक चांगली होणार आहे.
या वेळी मशीनचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील राऊळ, कॅप्टन दिनानाथ सावंत, संचालक जॉय डॉन्टस, शिवाजी परब, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे आणि काही पालक यांच्या उपस्थितीत पार पडले. शाळेच्या या नवीन सुविधेबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.



