ठाकरे, सेना कार्यकर्ते आक्रमक..
सावंतवाडी,दि.२५: शहरातील नगरपरिषदेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने शहरात कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, मोती तलावाच्या काठावरील फुटपाथवरही कचरा पसरला आहे. या गंभीर परिस्थितीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने च्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज सकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्यासह शिंदे युवा सेना यांनी कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांंसमवेत आरोग्य विभागाचे पांडुरंग नाटेकर यांची भेट घेतली आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. जर दुपारपर्यंत कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले नाही, तर शहरातील सर्व कचरा आणून नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर ओतण्याचा इशारा दिला. यावर मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
कर्मचाऱ्यांनी गेल्या चार महिन्यांपासून पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम न मिळाल्याने काम बंद केले आहे. आरोग्य विभागाचे पांडुरंग नाटेकर आणि दीपक म्हापसेकर यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून काम सुरू करण्याची विनंती केली, परंतु कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम सुरू करण्यास नकार दिला.
स्वच्छता विभागाचे पांडुरंग नाटेकर यांनी कर्मचाऱ्यांनी कोणतीही सूचना न देता काम बंद केल्याचे सांगितले, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेचे अधिकारी आणि कंत्राटदारांवर रोष व्यक्त केला.