खवणे बीचवर लुटला कायाकिंग व समुद्रस्नानाचा आनंद
सावंतवाडी,दि.२१: “गेली पाखरे उडून, मैत्री गेलो विसरून…ऋणानुबंधांच्या गाठी,आल्या आज जुळून!” या सुंदर ओळींची प्रचिती सावंतवाडी तालुक्यातील मळगाव हायस्कूलच्या मुलांना पुन्हा एकदा आली. निमित्त होते ते मळगाव इंग्लिश स्कूलच्या १९९१-९२ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.
बालपणीचे मित्र-मैत्रिणी तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले आणि शाळेच्या त्या अविस्मरणीय दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
शाळा म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, तर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची दिशा असते. याच शाळेतील बालमित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्याने आनंदाला पारावार नव्हता.
मळगाव हायस्कूलच्या प्रांगणात जमल्यानंतर सर्वजण बसने वेंगुर्ल्याच्या दिशेने रवाना झाले. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील ‘ब्लू लगुन हॉटेल’च्या रमणीय परिसरात या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर सगळे मित्र-मैत्रिणी रमले होते. अनेक वर्षांनंतर भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. काही जण तर पहिल्यांदाच भेटत असल्याने त्यांच्यातील उत्साह आणि उत्सुकता विशेषत्वाने जाणवत होती.
कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले होते. पहिल्या सत्रात ‘आज भी हम जवान है’ या संकल्पनेवर आधारित मनोरंजनात्मक खेळ आणि कार्यक्रमांची रेलचेल होती. उपस्थितांनी विविध कला-कौशल्ये सादर करत वातावरण उत्साहाने भारून टाकले. दुपारच्या लज्जतदार भोजनानंतर गाण्यांच्या भेंड्या, संगीत, गायन, वादन आणि मजेदार ‘फनी गेम्स’ रंगले. काही मित्र-मैत्रिणींनी नृत्याविष्कार सादर करत सगळ्यांना ताल धरायला लावला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मनोज मळगावकर आणि श्रुती रेडकर यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन हरिष नार्वेकर यांनी चोखंदळपणे सांभाळले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी योजना राऊळ-जामदार, मनीषा तानावडे, मदन शिरोडकर, गजानन मेस्त्री, सोनाली परब आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दुपारच्या सत्रानंतर खवणे बॅक वॉटरमध्ये कायाकिंगचा अनुभव घेण्यात आला. मित्र-मैत्रिणींनी एकत्रित आणि वेगवेगळ्या बोटींमधून कायाकिंगचा आनंद लुटला. त्यानंतर सायंकाळच्या रमणीय वेळेत खवणे बीचवर समुद्रात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला. वाढत्या वयाचा विसर पडून सगळे जण लहान मुलांप्रमाणे समुद्राच्या लाटांवर स्वार झाले आणि बालपणीच्या आठवणींमध्ये रमून गेले. वेळ कसा गेला हे कुणालाच कळले नाही आणि सूर्यास्ताची चाहूल लागताच सगळ्यांना घरच्या ओढीने बसकडे परतावे लागले.
या स्नेहमेळाव्यात आपल्या बालपणीच्या मित्रांना भेटल्यामुळे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यात प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, असे मनोगत अनेकांनी व्यक्त केले.
शेवटी, पुढील वर्षी याच उत्साहात आणि नव्या ठिकाणी पुन्हा भेटण्याचा संकल्प करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.