“प्रभावाखाली नाही, प्रकाशाखाली या” – स्वामी श्रीकंठानंद यांचे पत्रकारांना मार्गदर्शन

0
9

व्हॉईस ऑफ मीडियाच्या पहिल्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनचे थाटात उद्घाटन

नाशिक,दि.१९: “प्रभावाखाली न राहता प्रकाशाखाली यायला हवं,” अशा मर्मदर्शी आणि प्रेरणादायी शब्दांत स्वामी श्रीकंठानंद यांनी महिला पत्रकारांना विचारांची दिशा दिली. व्हॉईस ऑफ मीडिया व व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हे अधिवेशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

स्वामीजींनी आपल्या भाषणात सांगितले की, “महिलांनी आपली ओळख सामान्यत्वात शोधली पाहिजे. ‘मी जशी आहे, तशी मी अनुभवायला आले आहे’ हा आत्मस्वीकार महत्त्वाचा आहे. आपण सर्वज्ञ नाही, हे मान्य करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आत्मबळ निर्माण करणं.” त्यांनी साधेपणाचा पुरस्कार करताना असेही म्हटले की, “साधेपणा असेल, तर मंदिरात जाण्याची गरज भासत नाही. खऱ्या अर्थाने आध्यात्मिकतेचा प्रकाश आपल्या कृतीतून दिसावा लागतो.”
पत्रकारितेच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, “आज चार अँकरपैकी तीन महिला आहेत, ही स्थिती महिलांच्या प्रगतीचे द्योतक आहे. पण ही संधी उपयोगी ठरवण्यासाठी महिलांनी ‘आपण ही भूमिका कशी पार पाडणार?’ याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सकाळ-संध्याकाळ स्वतःवर काम करणं, आत्ममंथन करणं आवश्यक आहे.”

स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या टीका-टिप्पण्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. “स्वतःला सहनशील बनवलं, तर कोणताही त्रास त्रास वाटत नाही,” असं सांगत त्यांनी मानसिक सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. “बुद्धिमत्ता पुरेशी नाही, ती हृदयवाणी झाली पाहिजे. विचार मोठा असावा आणि मानसिक आहार सकस असावा. रोज ध्यान करा, स्वतःसाठी वेळ ठेवा. अहंकार दूर होतो आणि आपण व्यापक होतो,” हे त्यांच्या विचारांचे सार होते.

दुर्गाताई तांबे यांचा अनुभवसंपन्न सल्ला

यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्षा मा. दुर्गाताई तांबे यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, “पूर्वी महिला पत्रकार होणं हे फार मोठं आव्हान होतं. पण आज परिस्थिती बदलली आहे. महिलांनी आपली जागा निर्माण केली आहे. घटनेने महिलांना संधी दिली, तर घरच्या पाठिंब्यामुळे त्या त्या संधीचा पुरेपूर उपयोग करू शकतात.”

दुर्गाताईंनी भारतातील यशस्वी महिला पत्रकारांचा अभ्यास करण्याचा सल्ला देत नवोदित महिला पत्रकारांना योग्य दिशा दाखवण्याचे आवाहन केले.
या भव्य उद्घाटन सोहळ्यास दुर्गाताई तांबे, मोनिका राऊत पोलीस उपायुक्त, नाशिक, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, व्यंकटेश जोशी सामाजिक कार्यकर्ते व शेतीनिष्ट,राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले, प्रेरक वक्ते स्वामी श्रीकंठानंद, मोनिका राऊत पोलीस उपायुक्त नाशिक, सोहन माचरे पोलीस अधिकारी, व्हॉईस ऑफ मीडिया व व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी तसेच अनेक क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, महिला कार्यकर्त्या आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अधिवेशनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश पुढे आला – प्रभावाखाली नव्हे, तर विचारांच्या आणि सकारात्मकतेच्या प्रकाशाखाली काम करा. महिला पत्रकारिता हे केवळ व्यवसाय नाही, तर समाजाला दिशा देणारी शक्ती आहे, हे अधिवेशनात ठळकपणे अधोरेखित झाले. राज्यभरातून सर्व पदाधिकारी महिला या अधिवेशनात आल्या आहेत.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ट्रेनर गजेंद्र मेढी यांच्या मार्गदर्शनात राज्यभरातून आलेल्या महिला पत्रकारांची कार्यशाळा संपन्न होणार आहे. या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या प्रमुख वरिष्ठ शास्रज्ञ माधवी ठाकरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here