वक्तृत्व कलेतून बहरते आपले व्यक्तिमत्व.! : प्रा. रुपेश पाटील

0
22

पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकरांना भावपूर्ण आदरांजली.

सावंतवाडी,दि.२७ : विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगी विविध कला, कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत गरजेचे असून वक्तृत्व ही कला अलीकडच्या काळात खूप गरजेची आहे. कारण वक्तृत्वाने आपले व्यक्तिमत्व बहरते. म्हणून शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवा, हेच यश तुम्हाला भावी जीवनात यशाची द्वारे खुले करणार, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी इन्सुली येथे व्यक्त केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ, इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व पत्रकार तथा नाट्यकर्मी स्वर्गीय प्रवीण मांजरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी ‘सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा – २०२५’ गुरुवारी इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संपन्न झाल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. रुपेश पाटील बोलत होते.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष अशोक सावंत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार , सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्य मंगल कामत, मोहन जाधव,व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे पत्रकार शैलेश मयेकर राजेश नाईक,संजय पिळणकर तसेच पत्रकार नरेंद्र देशपांडे, प्रसन्न गोंदावळे, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, दिव्या वायंगणकर, विद्या विकास संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, संचालक अजय कोठावळे, सचिन दळवी, विकास केरकर, मयूर चराठकर, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुरेश गवस, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष बंड्या हळदणकर, सचिन सावंत, मुख्याध्यापिका सुविधा केरकर, उपमुख्याध्यापक संजय शेवाळे, सहाय्यक शिक्षक दिगंबर मोर्ये, सचिन पालकर, विनोद चव्हाण, चंद्रलेखा परब, तसेच स्पर्धेचे परीक्षक श्रीमती गौरवी पेडणेकर, श्री. नारकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिवंगत रंगकर्मी तथा पत्रकार प्रवीण सगुण मांजरेकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. रूपेश पाटील यांची निवड झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष अशोक सावंत व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते प्रा. पाटील यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन त्यांचे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुरेश गवस म्हणाले, शालेय जीवनात वक्तृत्व ही कला नक्की जोपासणे गरजेचे आहे. कारण आताचे युग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला सामोरे जाताना आपल्या अंगी वक्तृत्वासारखी कला नक्की असावी, जेणेकरून आपल्याला आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देता येते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष व उद्घाटक अशोक सावंत म्हणाले की, आपल्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे अपेक्षित नाही तर त्यांना भावी जीवनात स्पर्धा परीक्षासारख्या परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर त्यांना इतर कला, गुण व कौशल्य आत्मसात करणे क्रमप्राप्त आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. श्री. पवार म्हणाले आमच्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा एक अभ्यासू निवेदक व पत्रकार दिवंगत प्रवीण मांजरेकर हे अष्टपैलू संपन्न व्यक्तिमत्व होते. परंतु काळाने आपल्यातून त्यांना अचानक हिरावून घेतले हा आघात सहन करून आपण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अवगत असलेल्या व अभिरुची असलेल्या विविध कला जोपासणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे श्री
पवार यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका विद्या पालव यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार राजेश मोंडकर यांनी केले.

उद्घाटन कार्यक्रमानंतर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट वक्तृत्व सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here