लोकवर्गणीतून सावंतवाडीसाठी रुग्णवाहिका घेणार, १० लाखाचा खर्च अपेक्षित..

0
31

सामाजिक बांधिलकी व ओंकार कलामंचचा उपक्रम; दानशूरांनी मदत करा, शैलेश “पै” यांचे आवाहन..

सावंतवाडी,दि.०९: आपत्कालीन किंवा अपघातग्रस्त परिस्थितीत रुग्ण तसेच जखमींना तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा संकल्प सामाजिक बांधिलकी व ओंकार कला मंच या संस्थांकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत १० लाख इतकी किंमत असलेली रुग्णवाहिका ही लोक वर्गणीतून घेण्यात येणार आहे. आज येथे झालेल्या बैठकीत निधी संकलन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच निधी संकलन समिती लवकरच स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक शैलेश पै यांच्या अध्यक्षतेखाली येथील पर्णकुटी विश्रामगृहावर घेण्यात ही बैठक घेण्यात आली.
यावेळी रुग्णवाहिका आणण्यासाठी आवश्यक असलेली १० लाख इतकी रक्कम उभी करण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. पै यांनी केले. यावेळी सामाजिक बांधीलकी संस्थेचे अध्यक्ष सतिश बागवे, खजिनदार रवी जाधव, ओंकार कलामंचचे अध्यक्ष अमोल टेंबकर, जेष्ठ वकील ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, शैलेश नाईक, रुपा मुद्राळे, शाम हळदणकर, समिरा खलिल, हेलन निब्रे, विनायक गांवस, समिक्षा सावंत, भुवन नाईक, मृणाल पावसकर, साहिल सावंत, निखील माळकर, अवधुत सावंत, रुपेश पाटील, राज राऊळ, चेतन जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत सावंतवाडी शहरात आपत्कालीन परिस्थितीत मोफत आणि तात्काळ सेवा देता यावी यासाठी ही रुग्णवाहिका काम करणार आहे. शहरात या माध्यमातून मोफत सेवा देण्यात येणार आहे तर शहराबाहेर किंवा अन्य ठिकाणी सेवा देण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
रुग्णवाहिका खरेदीसाठी आणि अन्य आतील यंत्रणेसाठी तब्बल १० लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे त्यासाठी लोकवर्गणीतून निधी संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी समाजातील सर्व दात्यांनी पुढाकार घेवून हा प्रश्न महिनाभरात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा संकल्प यावेळी सोडण्यात आला. यासाठी ज्या दानशुर व्यक्तींना आर्थिक सहकार्य करायचे आहे. त्यांनी सामाजिक बांधीलकीचे रवी जाधव 9405264027 आणि शैलेश नाईक 9422379567 यांच्याशी संपर्क साधून मदतीच्या स्वरुपात देण्यात येणारी रक्कम रोख किंवा धनादेशाच्या स्वरुपात द्यावी, असे आवाहन श्री. टेंबकर यांनी केले.
यावेळी शैलेश पै म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहीका उपलब्ध होत नाही. ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांनी पुढाकार घेवून रुग्णवाहिका आणण्याचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे समाजातील दानशुर लोकांनी त्यांच्या पाठीशी रहावे आणि सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, सामाजिक बांधिलकी या संस्थेच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here