कोकणाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी विद्यार्थी परिषदेचा पुढाकार महत्त्वाचा – प्रा. मनीष जोशी
सावंतवाडी,दि.२७: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोंकण प्रांताच्या ५९ व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरी, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे, अभाविप कोंकण प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, कोंकण प्रांत मंत्री राहुल राजोरिआ, स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै काणे, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, अभाविप सावंतवाडी शहर अध्यक्ष प्रा. साईनाथ सितावार, अभाविप सावंतवाडी शहर मंत्री स्नेहा धोटे मंचावर उपस्थित होते.
आपल्या उद्घाटकपर भाषणात प्रा. मनीष जोशी म्हणाले की आपल्या देशाच्या विकासासोबतच देशातील सर्व भागांचा विकास झाला पाहिजे आपल्या भागातील समस्यांचा विचार करून आपला भाग विकसित झाला पाहिजे यासाठी विद्यार्थी संघटना आग्रह धरते हे कौतुकास्पद आहे. कोकण रेल्वेच्या आंदोलनात विद्यार्थी
परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आणि आता कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते चालवत असलेली चळवळ हे खऱ्या अर्थाने अभिनंदनीय आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धरलेला आग्रह यामुळेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मातृभाषेत शिक्षण सुरू होत आहे.
विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते केवळ आजचा विचार न करता पुढील अनेक वर्षांमध्ये देशासमोरील संधी व आव्हाने यावर चिंतन करून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विमर्श तयार करण्याचे काम अभाविप करत आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे म्हणाले की, समृद्ध आणि विकसित कोकणासाठी कोकणातील विद्यार्थी विचारमंथन करत आहेत. कोकणाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी आपण पुढे आहात हे अभिनंदनीय आहे.
आपण सर्व राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत कार्यकर्ते आहात, यामुळे आपण ज्या भूमीतून येतो ती भूमी विकसित आणि सुरक्षित असावी यासाठी आपण सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांनी आग्रही असावे.
आपल्या अध्यक्षीय उद्बोधनात कोंकण प्रांत अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी अनेक अडचणींवर मात करत अधिवेशनाचे यशस्वी आयोजन केले आहे.
स्वर्गीय सौंदर्य असणाऱ्या कोकणात शाश्वत विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी शासन यंत्रणेसोबत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे.
कोकण विकासाची सप्तसूत्री पर्यटन, प्रगत शेती, फलोत्पादन, फळप्रक्रिया उद्योग, वनशेती, वनऔषधी, मत्स्यव्यवसाय यांच्या माध्यमातून कोकणातील तरूणांसाठी कोकणात रोजगार निर्मिती करू शकतो.
प्रांत मंत्री राहुल राजोरिआ म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थी कार्यकर्ता आपल्या कॅम्पस मध्ये कार्यक्रम, आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम करत असतो अश्या कार्यकर्त्यांसाठी अधिवेशन हा विद्यार्थ्यांचा सोहळा आहे.
आपल्या स्वागतपर भाषणात स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर म्हणाले की, मुंबई पासून गोव्यातील कोणकोण पर्यंत च्या राष्ट्रवादी विचारांवर आपल्या कॉलेज कॅम्पस मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करतो.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभाविप सावंतवाडी शहर मंत्री स्नेहा धोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभाविप सावंतवाडी शहर अध्यक्ष प्रा. साईनाथ सीतावार यांनी केले.