वेंगुर्ले, दि.२९: कै. रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ येथे जनसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत व हॅनी मॅनसिंग यांनी गडकिल्ले व संवर्धन याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. संजीव लिंगवत हे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असुन दुर्गसंवर्धन, अवयव दान, अंधश्रद्धा निर्मूलन,ग्राहक साक्षरता, नशाबंदी या विषयावरील महाराष्ट्र राज्यातील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेवर व्यसन या विषयावर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलं आहे.
तसेच हॅनी मॅनसिंग या आंतरराष्ट्रीय स्तरावरिल सोळा भाषांमध्ये इंग्रजी भाषेतील पुस्तके रुपांतरीत करतात, म्हणजे त्या लॅग्वेज ट्रान्सलेटर असुन इतिहास व पर्यावरण या विषयावरील त्या अभ्यासक आहेत. मुळ हाॅलंड, नेदरलँड्स येथील नागरिक असलेल्या हॅनी यांनी वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार च्या सध्या चालू असलेल्या संवर्धन कामात या ऐतिहासिक वास्तूचा मुळ आराखडा उपलब्ध करून देऊन पुरातत्व विभागाला पण सहकार्य केले आहे.
दोन्ही मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून गडकिल्ले याबाबत मार्गदर्शन केले तसेच वेंगुर्ले येथील डच वखार बाबत माहिती दिली. त्याचबरोबर गडसंवर्धन काळाची गरज का आहे याचे महत्व विषद केले. यावेळी प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अजित तांबे, पांडुरंग चिंदरकर, प्रतिमा साटेलकर, पदवीधर शिक्षक गणेश नाईक उपस्थित होते. दोन्ही मार्गदर्शकांचे शाळेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.