अर्चना घारे परब यांचे राजन तेली यांना प्रत्युत्तर..
सावंतवाडी,दि.१०: महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका करत होता. शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी विषयी आपण काय बोलत होता.. ?जरा आठवा, शरद पवार यांनी कोकणासाठी काय केले ? तुम्हीच प्रेस घेऊन सुप्रिया सुळे यांना सिंधुदुर्ग दौर्यावर असताना विचारले होते ना.. ? आता आयत्या वेळेला येऊन तिकिटावर डल्ला मारला. आणि मग शरद पवार यांची आठवण झाली ? आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय फक्त तुमच्या सारख्या आयाराम – गयारामाचे काम करायचे का ? पक्षाच्या कठीण काळात पक्षा बरोबर आम्ही रहायचे आणि आयत्या वेळेला तुमच्या सारख्या सराईत दलबदलूने यायचे आणि आम्ही त्याचा उदो उदो करायचा ? असे कसे चालेल.. ? तेव्हा या पुढे मीच नाही तर कोणत्याही स्वाभिमानी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर बोलताना विचार करून बोला.
आपली मतदारसंघात विश्वासार्हतता काय ? प्रतिमा काय ? एकदा तपासून पहा. तुम्हाला या मतदारसंघातील जनतेने दोन वेळा का नाकारले याचे देखील एकांतात एकदा जमत असेल तर आत्मचिंतन करा. २०१९ ला तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बंडखोरी केली होती ? तुमच्या पाठीमागे कोण होते ? काल पर्यंत तुम्ही कोणत्या विचारांबरोबर होते ? उद्या तिकडे पुन्हा कशावरून जाणार नाही. या बद्दलही मतदारांमध्ये तुमच्या विषयी शंका आहे. कारण तुम्ही पक्ष बदलण्यामध्ये पटाईत आहात. तुमची उमेदवारी मुळात कोणत्याच स्वाभिमानी कार्यकर्त्याला पसंत नाही. महाविकास आघाडीतील याच स्वाभिमानी कार्यकर्त्याच्या आणि मायबाप जनतेच्या सांगण्यावरून मी या निवडणुकीत उभी आहे.
त्यामुळे बोलताना पुराव्या सह बोला. तुम्ही असाल कणकवलीचे म्हणुन मी घाबरणार नाही. मी देखील परबांची लेक आहे. माझ्यावर सावंतवाडीचे संस्कार आहेत. मी स्वतःहून कोणावर टीका टिपणी करत नाही. पण तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करत असाल तर मी गप्प बसणार नाही. अशा परखड शब्दात अर्चना घारे यांनी राजन तेलींना त्यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रत्युत्तर दिले .