जनसामान्यांसाठी माझा लढा.. अपक्ष उमेदवार सुनील पेडणेकर

0
24

सावंतवाडी,दि.०६ : सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये मागील निवडणुकीत माझे डिपॉझिट जप्त झाले. तरी देखील यावेळी देखील मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे. कारण हा माझा लढा जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी आहे. काही लोकांनी सिंधुदुर्ग जिल्हा लुटून अक्षरशः अवैध मार्गाने खोर्‍याने पैसा कमावला आहे. त्याची उधळपट्टी आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की होणार, मात्र जनतेने आता आपल्याला फसविणार्‍या लोकांपासून सावध राहावे, अशी रोखठोक टीका अपक्ष उमेदवार सुनील पेडणेकर यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पेडणेकर बोलत होते.

यावेळी अपक्ष उमेदवार सुनील पेडणेकर पुढे म्हणाले, माझी अपक्ष उमेदवारी कायम असून मला ‘फलंदाज’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तरी तमाम मतदार बांधवांनी आणि भगिनींनी मला भरघोस मतं देऊन आपल्या सेवेची एकदा संधी द्यावी, मी आपला विश्वास नक्कीच सार्थक ठरवेल, असे देखील आवाहन त्यांनी केले.

दरम्यान सुनील पेडणेकर यांनी विरोधकांवर चौफेर टीका करत सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीनही तालुक्यांमध्ये आजही पायाभूत सुविधांची गरज का आहे?, असा सवाल केला. तब्बल तीन वेळा या मतदारसंघाने विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना संधी दिली. मात्र ते कोकणात कमी आणि मुंबईतच जास्त ठाण मांडून का राहतात?, कारण मायानगरीत असलेली आर्थिक माया कमविण्यासाठी त्यांचा अधिक प्रयत्न असतो, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच माझ्यासमोर उभे असलेल्या एकाही उमेदवाराचा आमदारकी पदासाठी हवा असलेला अभ्यास झालेला नसून मी सातत्याने अभ्यास केला आहे, असाही दावा त्यांनी केला. काही उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिज संपत्तीचा पुरेपूर उपयोग करून त्यातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात सावंतवाडी मतदारसंघात मतदार राजांचे मत विकत घेण्यासाठी अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here