संजूच्या प्रेमापोटी बैठकीला बांदा दशक्रोशीतून प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती..
सावंतवाडी,दि.२०: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना उबाठा मध्ये प्रवेश केल्याने भाजपचे कार्यकर्ते भाजप सोबतच आहेत हे दाखविण्यासाठी भाजपचे नेते व प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी बांदा दशक्रोशीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला.
भाजपचा एकही कार्यकर्ता हलला नसल्याचे संजू परब यांनी दाखवून दिले.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांची राजकीय कारकीर्द अगदी शाखाप्रमुख पासून सुरू झाली ते पक्षाचे तालुकाप्रमुख जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष अशी राहिल्याने व त्यांच्या कारकीर्दीत सावंतवाडी पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर झेंडा फडकल्याने त्यांना विधानसभेचे दावेदार समजले जात होते, मात्र पक्षाच्या युतीमुळे दोन वेळा चालून आलेली संधी हुकली व यावेळी भाजपकडून संजू परब की राजन तेली अशी चर्चा असताना पुन्हा एकदा महायुती झाल्याने ही जागा शिंदे शिवसेनेला दिली गेली, तेव्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ नये म्हणून शिवसेना उबाठा मध्ये प्रवेश केला.
गेली दहा वर्षे राजन तेली भाजपसोबत राहिल्याने अनेक कार्यकर्ते राजन तेली यांच्याशी जोडले गेले होते ते कार्यकर्ते भाजपमधून राजेंतली सोबत जाऊ नये यासाठी भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी फिल्डींग लावली त्यात माजी नगराध्यक्ष संजू परब व भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांचा मोलाचा वाटा आहे ,काल भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी बांदा दशक्रोशीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मडुरा येथील आपल्या शेत बागेत बोलावली होती या बैठकीला भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिल्याने संजू परब यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता, उपस्थित कार्यकर्त्यांनी आपण सर्वजण भाजप व संजू परब यांच्यासोबत आहोत असे बैठकीत बोलताना सांगितले, कोणी कितीही आमीषे दाखविली तरी आमचा एकही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी कुठेही जाणार नाही असे वचन सर्वांनी संजू परब यांना दिले.
यावेळी संजू परब यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार माणून आज पर्यंत आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल पक्षाच्या वतीने मी वैयक्तिक आपला ऋणी आहे ,यापुढेही सहकार्य असेच ठेवून भाजप च्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले आहे.