सिंधुदुर्गनगरी,दि.३०: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कार्यालयात “टेंडर” मॅनेज करण्यासाठी अंगरक्षक आणल्याची घटना आज येथे घडली. त्या ठिकाणी आलेल्या सर्वसामान्य लोकांची कागदपत्रे तपासण्याचा प्रकार झाल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने हा प्रकार उधळून लावला. यावेळी काही अंगरक्षकांना शिवसैनिकांनी बेदम चोप दिला. यात काही अंगरक्षक पळून गेले तर चौघांना पकडण्यात यश आले आहे.
दरम्यान या प्रकारामुळे जिल्हा परिषदेतच्या प्रशासनात खळबळ माजली आहे. घाटमाथ्यावरील ठेकेदाराने हा प्रताप केला असावा, अशी उलट सुलट चर्चा आहे. सावंतवाडी पंचायत समितीचे आठ कोटी रुपयांचे टेंडर मॅनेज करण्यासाठी हा सर्व लवाजमा आला असल्याचे दबक्या आवाजात चर्चा होत आहे. दरम्यान काही झाले तरी असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.