सावंतवाडी,दि.३१: अल्पवयीन मुलीचे नाव लिहून माडखोल गावात एका परजिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासकार्याप्रसंगी संबंधित पोलिस अधिकाऱ्याने
गैरवर्तन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सदर प्रकरणातील अधिकारी हा बदलावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासाठी सावंतवाडी पोलिस ठाणे येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी पाठिंबा दिला.
अर्चनाताईंनी महिला आयोग, राज्य महाराष्ट्र अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांच्याशी सदर घटनेविषयी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षक यांच्याशी चर्चा करत आवश्यक सुचना केल्या. दरम्यान, तपासकामात अधिकारी बदलण्याच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार कार्यवाहीचे आश्वासन पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिले. त्यामुळे हे आंदोलन तुर्तास थांबविले. महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी महिलांना होणारा त्रास याची दक्षता घेत, जबाबदारीने हे प्रकरण हाताळावे अशी विनंती पोलिस निरीक्षक यांना अर्चना घारे यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अँड. सौ.सायली दुभाषी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, सौ. सोनाली परब,राजकुमार राऊळ,संजय लाड,संतोष राऊळ, संदीप सुकी,संतोष राणे,विशाल राऊळ,मनोज घाटकर, सत्यवान बंड, प्रमोद बंड, उल्हास राणे तसेच माडखोल ग्रामस्थ उपस्थित होते.