भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र त्रैवार्षिक अधिवेशन आळंदी येथे संपन्न

0
25

सिंधुदुर्ग,दि.२७: भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रांताचे त्रैवार्षिक अधिवेशन आळंदी येथे २४ व २५ ऑगस्ट रोजी करवा धर्मशाळेत संपन्न झाले. या अधिवेशनात प्रांताध्यक्षपदी बळीराम सोळंके यांची, तर महामंत्रीपदी मदन देशपांडे यांची पुनरनिवड करण्यात आली. संघाच्या नवीन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली असून २१ सदस्यांची कार्यकारीणी स्थापन झाली आहे.

अधिवेशनात, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील २५ जिल्ह्यांमधून आलेल्या ४५५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. दरम्यान सिंधुदुर्गातून प्रांत मंत्री धनंजय गोळम,मनोहर ठिकार उपस्थित होते.

आगामी तीन वर्षांसाठी जिल्हावार नियोजन करण्यात आले आहे, ज्यात ग्रामस्तरावरील संघटनांना
अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचा कौशल्य विकास व शेतीशी संबंधित समस्यांचे निराकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे.

अधिवेशनात शेतीविषयक ६ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. या ठरावांत सर्व कृषिपंपांना विनामूल्य विजपुरवठा योजना, नद्या गाळ मुक्त करून पूर स्थिती टाळणे, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षणासाठी शिकारीचा अधिकार, पशुक्षय नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणी योजना, कापूस व सोयाबीन पिकांचे एमएसपी आधारित खरेदी केंद्रे सुरू करणे, आणि कृषि परिवर्तन स्मार्ट योजनेतील जाचक तरतुदींचे सुधारणा यांचा समावेश आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन शेतकरी शास्त्रज्ञ प्रतापराव चिपळूनकर यांच्या हस्ते झाले, ज्यात त्यांनी विनामशागतीच्या शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती किफायतशीर कशी बनू शकते यावर मार्गदर्शन केले. अखिल भारतीय संघटमंत्री दिनेशजी आणि कैलाश धाकड यांनी कार्यकर्त्यांच्या कौशल्य विकासाद्वारे शेती क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अधिवेशनात प्रदेश संघ मंत्री दादा लाड व किशोर ब्रम्हनाथकर देखील उपस्थित होते.
सुत्रसंचालन सौ. प्रतिमा मोरे, मनोज व्यवहारे, डॉ. संतोष गटणे, राजश्री जामगे व प्रमोद लांगी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here