मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीची बैठक संपन्न

0
24

बँक खाते आधारशी संलग्न करावे..जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्ग,दि. ०५: राज्यातील महिला आणि मुलींचं आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी संलग्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे गठन करण्यात आलेले आहे. विधानसभा क्षेत्रातील तालुका स्तरावरुन तात्पुरते पात्र केलेल्या व डॅशबोर्डवर दिसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीस अंतिम मंजुरी देण्यासाठी सदर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सावंतवाडी- २१ हजार २२८, दोडामार्ग- ६ हजार ४०६, कणकवली – २१ हजार ०५६, कुडाळ- २६ हजार २२३ , वैभववाडी- ७ हजार २२८, देवगड- २१ हजार ३१३, वेंगुर्ला १५ हजार ३०७, मालवण- १६ हजार ७६६ अशा १ लाख ३५ हजार ५२७ पात्र लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरी देण्यात आली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, श्रीमती संजना संदेश सावंत, सुप्रिया संतोष वालावलकर, श्रीमती श्वेता दिलीप कोरगावकर, रुपेश रविंद्र कानडे, सतीश दामोदर परुळेकर, प्रसन्ना लक्ष्मण देसाई, एकनाथ नाडकर्णी, श्रीमती सावी गंगाराम लोके, श्रीमती सिमा शरदचंद्र नानिवडेकर, महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here