अर्चना घारेंनी विद्यार्थ्यांना दिल्या मौलिक टिप्स
सावंतवाडी,दि.१७ : स्वतः आयआयटी सारख्या दिग्गज शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेऊन आज आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन देण्यासाठी परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून अत्यंत कष्ट घेत असणारे प्रा. राजाराम परब यांचे सुयोग्य मार्गदर्शन आणि परफेक्टची मौलिक साथ याला विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रामाणिक कष्टाची जोड दिली तर नक्कीच आपण योग्य ध्येयापर्यंत पोहोचाल, अशी आशा अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या अर्चना घारे -परब यांनी येथे व्यक्त केली.
सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी विद्यालयात कोकण आणि गोव्यातील क्रमांक एकची परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने इयत्ता अकरावीसाठी जेईई, नीट, एमएचटी-सीईटी व एनडीएसाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू झाली असून याला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
दरम्यान दहावीतून अकरावीत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी आरपीडी विद्यालय आणि परफेक्ट अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत ब्रिज कोर्स वर्गाला सुरुवात झाली आहे. रविवारी या वर्गास अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी आपले सहकाऱ्यांसह सदिच्छा भेट दिली व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. यादरम्यान त्यांनी आपला खडतर शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसोबत उघडला. सौ. घारे म्हणाल्या, आपण जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा फारसे मार्गदर्शन मिळत नव्हते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने कोकणातील विद्यार्थी मागे पडत होता. मात्र आता दहावी आणि बारावीच्या निकालात आपण राज्यात प्रथम क्रमांकावर आहोत. हे निश्चित भूषणावह असले तरीही अजूनही विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही.मात्र आता परफेक्ट अकॅडेमी आणि आरपीडी विद्यालयाच्या वतीने यथायोग्य मार्गदर्शन मिळत आहे. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना उच्च पदस्थ शिक्षण देणाऱ्या योग्य संस्थांची ओळख आणि सर्वोत्तम डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स घडविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या परफेक्ट अकॅडेमीची साथ लाभणार आहे. स्वतः प्रा. राजाराम परब सर यांनी आयआयटीसारख्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन आपली बौद्धिक क्षमता दाखवून दिली आहे. त्यांच्या ज्ञानाचा कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे सांगत सौ. घारे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना जे जे सहकार्य लाभेल लागेल ते सर्व आपल्याकडून निश्चित मिळत जाईल, असे आश्वासित केले.
सौ. घारे पुढे म्हणाल्या, आरपीडी विद्यालय व परफेक्ट अकॅडेमीच्या मार्गदर्शनातून पुढील दोन वर्षात सिंधुदुर्गातील विद्यार्थी हा नक्कीच राष्ट्रीय पातळीवर छाप सोडणारा तयार होईल आणि सिंधुदुर्गचे नाव जगभरात पोचवण्यासाठी येथील विद्यार्थी नक्कीच नावारूपास आल्याशिवाय राहणार नाही, असाही आशावाद सौ. घारे यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋत्विक परब, युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सावली पाटकर, पूजा दळवी, सुनिता भाईप, सुधा सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. राजाराम परब यांनी अर्चना घारे व सहकाऱ्यांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शितल कांबळी, परिमल धुरी, संदेश परब यांसह परफेक्ट अकॅडेमीच्या टीमने प्रयत्न केले.