भरतनाट्यम क्षेत्रातील यशस्वी प्रवास : अभिनंदनाचा वर्षाव
सावंतवाडी,दि.३१: तालुक्यातील मळगाव गावची सुकन्या सौ.जाई प्रशांत कामत हिने ठाणे येथील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पद्मश्री दर्शना झवेरी आणि गुरू तुषार गुहा यांच्या उपस्थितीत भरतनाट्यम अरंगेत्रम सादर केले. भरतनाट्यम विशारद झाल्यानंतर तिने अरंगेत्रम सादर करीत या क्षेत्रातील आपले पुढील मार्गक्रमण सुरू केले.
सौ.जाई कामत अर्थात पूर्वाश्रमीच्या जाई लवू कुडव यांनी आपला भरतनाट्यमचा प्रवास सावंतवाडीत गुरू ज्योती क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने सुरू केला होता. पुढे मुंबईत
गुरू श्रीमती संगीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यांजली संस्थेमार्फत भरतनाट्यम विशारद झाली. सावंतवाडी येथे असताना भरतनाट्यमच्या तीन व मुंबईत गेल्यानंतर पुढील चार परीक्षा असा विशारद होण्यापर्यंतचा प्रवास तिने यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यानंतर या क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असलेले अरंगेत्रम सादर करून पुढील कारकीर्दीचा श्री गणेशा केला.
अरंगेत्रम ही भरतनाट्यम नर्तकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे. कारण ती त्यांच्या प्रशिक्षणाची समाप्ती आणि त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात दर्शवते. हे नर्तकाच्या कौशल्याचे आणि अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे प्रदर्शन आहे. हे एक मार्गक्रमण असून विद्यार्थ्याकडून व्यावसायिकतेकडे जाण्याचा आणि भरतनाट्यम समुदायात नर्तकाचे स्थान दृढ करणारा प्रवास आहे.भरतनाट्यम अरंगेत्रम हा भरतनाट्यम नर्तकाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. हा नर्तकांच्या कौशल्यांचा आणि कर्तृत्वाचा उत्सव आहे आणि या सुंदर कला प्रकारासाठी त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि उत्कटतेचा दाखला आहे,
त्यामुळेच या अरंगेत्रम वेळी
तिचे गुरू, कुटुंबीय आणि मित्रमंडळी तसेच भरतनाट्यम समुदायाचे सदस्य त्यांचा पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी उपस्थित होते.
सौ. जाई कुडव – कामत हिचे प्राथमिक शिक्षण मळगाव येथे झाले. त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सावंतवाडीतील कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. शालेय स्तरावर विविध स्पर्धांमधून ती सहभागी होत असे. तिचे वडील लवू कुडव हे सावंतवाडीतील कै. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात सेवेत होते. याच दरम्यान या महाविद्यालयाच्या वार्षिक संमेलनात ज्योती क्षीरसागर यांचा भरतनाट्यम चा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. त्यापासूनच प्रेरणा घेऊन जाई ही भरतनाट्यमकडे वळली व त्यानंतर मागे वळून न पाहता तिने या क्षेत्रातील विशारद पदापर्यंत यशस्वी झेप घेतली. तिच्या या प्रवासात तिच्या आई-वडिलांचे तसेच गुरूंचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे ती आवर्जून सांगते. तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.