असनिये गावातील युवकांनी लावलेल्या सर्वपक्षीयांना गावात प्रचार बंदी बॅनरची सर्वत्र चर्चा

0
57

लक्ष वेधुनही रस्त्यासह इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निर्णय

सावंतवाडी,दि.०३: असनिये – घारपी मुख्य रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर असूनही गेले वर्षभर या कामाचा पत्ताच नाही. याबाबत आंदोलन व उपोषण करूनही आश्वासन पलीकडे कोणतीही कार्यवाही केली नाही. प्रशासनासह मंत्री, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यानीही याकडे दुर्लक्ष केले. गावात इतर समस्याही कायम आहेत. याच्या निषेधार्थ असनिये गावातील संतप्त युवकांनी या रस्त्यासह इतर समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत लोकसभा निवडणुकीत सर्वपक्षीय पुढारी व कार्यकर्ते यांना या गावात प्रचाराला बंदी घातली असून तसा फलकच या गावाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे

असनिये – घारपी या मुख्य रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून वाहन चालकांसह पादचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एसटी बस सेवा ही बंद होण्याच्या मार्गावर आहे. या रस्त्याच्या पुन:डांबरीकरणासाठी अनेक वर्षांच्या मागणीनंतर निधी मंजूर झाला. परंतु याला एक वर्ष झाले तरी अद्याप कोणतेही कार्यवाही नाही. या रस्त्याबाबत असनिये ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांनी अनेक वेळा मंत्री लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासनाचे अनेक वेळा लक्ष वेधले. आंदोलन तसेच उपोषणही केले परंतु या रस्त्याचा प्रश्न जैसे थे आहे. केवळ खोटी आश्वासाने देऊन असनियेवासियांच्या तोंडाला पाने पुसण्यापलीकडे काहीही केले नाही.
लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत एखाद्या गावाच्या वेशीवरच मतदानाच्या प्रचारासाठी बंदी असे फलक लागणे ही प्रशासनाची नामुष्की असुन जिल्ह्याचा विकास केला आहे आणि यापुढे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू अशा थापा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना ही एक प्रकारची चपराकच आहे.प्रशासनासह मंत्री, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यांची उदासिन भुमिका व त्यांच्या खोट्या आश्वासनासह भूलथापांना कंटाळून या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर होणाऱ्या विधानसभा व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्वच निवडणुकीत राजकीय पक्षाच्या नेत्यांना, पुढाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना या गावात प्रचारासाठी प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याचे असनिये गावातील युवकांनी सांगितले.
त्यांनी गावात प्रचार बंदी म्हणून लावलेल्या “त्या बॅनरची” सर्वत्र चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here