बालवैज्ञानिक प्रदर्शनात नरेंद्र देशमुख यांचे व्याख्यान

0
75

सिंधुदुर्गनगरी दि ११: सावंतवाडी येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी नरेंद्र देशमुख यांचे ‘विज्ञान आणि समाजावर सूक्ष्मदर्शकाचे होणारे परिणाम’ या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानाचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालवैज्ञानिक प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस होता.

आपल्या मार्गदर्शनात श्री देशमुख यांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध कसा लागला व त्यात काळानुरूप कसे बदल होत गेले, या सूक्ष्मदर्शकाचा विज्ञान व इतर क्षेत्रात कसा उपयोग होत आहे याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच दहावी व बारावी नंतर विज्ञान संशोधन क्षेत्रातील संधीबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या पेटंट प्राप्ती, सूक्ष्मदर्शकाचा शोध याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली.
राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालक मा. राधा अतकरी व इतर सदस्य, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजकुमार अवसरे, भोसले पॉलिटेक्निक चे अच्युत सावंत भोसले, सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी श्रीम. कल्पना बोडके, राज्य विज्ञान सल्लागार राजू नेब, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नरेंद्र देशमुख यांचे स्वागत राज्य विज्ञान संस्थेचे अधिव्याख्याता प्रविण राठोड यांनी केले. सूत्रसंचालन सुमेधा नाईक यांनी केले. आभार सिंधुदुर्ग डाएटच्या अधिव्याख्याता स्नेहल पेडणेकर यांनी मानले.
दुसर्‍या दिवशी विज्ञान विषयक प्रश्नांचा चालताबोलता प्रश्नमंजुषा कार्यक्रम विविध सहभागी विद्यार्थी व शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता. विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर यांचे चारशे पेक्षा अधिक प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले असून हे प्रदर्शन बुधवार १४ फेब्रुवारी पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

पहिल्या दिवशी सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. तर दुसर्‍या दिवशी १९०० विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील प्रकल्पांची भेट दिली .

सोमवारी तिसर्‍या दिवशी सकाळी ०९ वाजता गोवा विज्ञान केंद्राचे रोहीत निकम यांचे लिक्विड नायट्रोजन या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर संध्याकाळी भरडधान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न या विषयावर आयसीएआर गोवा डॉ. गोपाळ महाजन यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here