सिंधुदुर्ग,दि.२१: पेंडूर मोगरणे येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या शोध मोहिमेत नवीन छोटी मोठी बारा कातळशिल्पे सापडली.
दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे आज दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी वेताळगड पाण्याच्या टाक्या स्वच्छता मोहिमेनंतर पेंडूर मोगरणे व धामापूर गोड्याचीवाडी येथील कातळशिल्पे दर्शन मोहीम आखण्यात आलेली होती. धामापूर गोड्याचीवाडी येथील चार कातळशिल्पे बघितल्यानंतर पेंडूर मोगरणे येथील मोठ्या कातळशिल्पे बघितल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या पाच छोट्या कातळशिल्पाच्या बाजूला असणाऱ्या काताळावर अजून बारा कातळशिल्पे आढळली. यातील काही कातळशिल्पे ही प्राण्याची, हत्यारांची आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये धामापूर गोड्याची वाडी येथे दोन व पेंडूर मोगरणे येथे तीन कातळशिल्पांचा शोध दुर्ग मावळाच्या सदस्यांनी लावलेला होता. त्यात आता अजून बारा कातळशिल्पांची भर पडली आहे.
या कातळशिल्पांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या कातळशिल्पांच्या संवर्धनाचे लवकरच काम हाथी घेतले जाणार असल्याचे दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक यांनी सांगितले.
या शोध मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, रामदास तांबे, जालिंदर कदम, योगेश येरम, प्रसाद पेंडूरकर, रोहन राऊळ, यतीन सावंत, लक्ष्मण फोफळे आदी उपस्थित होते.