ओटवणे, दि. २२ : गेल्या अनेक वर्षांपासून बीएसएनएल नेटवर्कच्या प्रतिक्षेत असलेल्या असनियेसारख्या दुर्गम डोंगराळ भागाचा नेटवर्कचा दुष्काळ लवकरच संपणार असून बीएसएनएलच्या फोरजी टॉवरचे भूमिपूजन असनिये सरपंच रेश्मा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे असनिये परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
असनिये गावात बीएसएनएलच्या नेटवर्कच्याअभावी ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शासनाच्या संगणकीय प्रणालीच्या सक्तीमुळे ऑफलाईन सेवा देता येत नाही. त्यामुळे गावातील संबंधित अधिकारी कर्मचारी व ग्राहक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. पर्यायाने संबंधितांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे असनिये गावच्या सरपंच रेश्मा सावंत यांनी बीएसएनएलकडे फोरजी टॉवर उभारण्याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर या ठिकाणी टॉवर मंजूर करण्यात आला. परंतु या टॉवरचे काम सुरू करण्यात येत नव्हते. त्यानंतर असनिये शिवसेना शाखाप्रमुख राकेश सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर या मोबाईल टॉवरच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी लक्ष्मण सावंत, राकेश सावंत, भरत सावंत, संदेश कोलते, संभाजी कोलते, दीपक सावंत, आनंद सावंत, अनिल सावंत, प्रशांत ठीकार, शशिकांत सावंत उपस्थित होते.