सावंतवाडी, दि.१८ : मुंबईतील ५८ गिरणी कामगार व वारसदार यांनी घरासाठी अर्ज भरून दिले. त्याची पडताळणी यादी ऑनलाईन पद्धतीने भरून देण्याची गरज आहे. मात्र अनेक गिरणी कामगार व वारसदार यांना पुरावे शोधण्यासाठी मुंबई गाठूनही काही गिरणी मधून प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता हस्तक्षेप करून मार्ग काढला पाहिजे असे सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष शामसुंदर कुंभार यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, गिरणी कामगारांच्या जानेवारी १९८२ च्या अभुतपुर्व संपात उध्वस्त आणि मुंबईतून विस्थापित झालेल्या कामगारांना सन २००१च्या शासन निर्णयानुसार मुंबईच्या ५८ गिरणींच्याच जमीनीवर घरे देण्याचे जाहीर झाले आहे. त्यानुसार सुमारे पावणेदोन लाख गिरणी कामगारांनी घरांसाठीे अर्ज सादर केले आहेत. अलिकडेच या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय मुंबई म्हाडाने घेतला आहे. तरी गिरणी कामगारांनी आपल्या अर्जांसोबत ऑनलाईनवर पुरावे म्हणून आपल्याकडे असलेली कागदपत्रे समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी तेरा पुरावे किंवा काही महत्त्वाचे कागदपत्रे जोडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची गरज आहे.
मुंबई म्हाडाने २०११ ते २०१७ या कालावधीत घरांसाठी ३ बॅंकांच्या माध्यमांतून घरांसाठी सुमारे पावणेदोन लाख अर्ज स्विकारले आहेत. मात्र हे अर्ज सादर करताना गिरणी कामगारांना सोबत कोणताही पुरावा जोडण्यास सांगितले नव्हते. ते पुरावा म्हणून कागदपत्रे जोडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची गरज आहे, श्री कुंभार यांनी सांगितले.
गिरणी कामगार व वारसदार गेल्या ४० ते ४५ वर्षांपूर्वी देशोधडीला लागले आहेत. सर्व कामगार व वारसदार यांच्याकडे पुरावे सापडले नाहीत शिवाय आता पडताळणी यादी भरून दिली गेली नाही त्यांना म्हाडाने पत्र टाकलं आहे. गिरणी कामगार व वारसदार यांनी पुरावे शोधण्यासाठी गिरणी ची कार्यालय, म्हाडा व युनियन ऑफिस मध्ये जाऊन पुरावे शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र दाद दिली जात नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. आता गिरणी कामगार वयोवृद्ध झाले आहे तर वारसदार ग्रामीण भागात जीवन व्यतीत करत आहेत त्यामुळे मुंबई सारख्या मायानगरी मध्ये शोधकार्यात सहकार्य मिळत नाही असे शाम कुंभार यांनी सांगितले.
ते म्हणाले, म्हाडा चा बँक मार्फत अर्ज भरून देताना कै दिनकर मसगे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याकडे काही पावत्या होत्या. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांनी आमच्या ताब्यात पावत्या दिल्या आहेत. त्या आमच्याकडे आहेत त्या घेऊन जाव्यात.