डॉ. परूळेकर यांच्या मार्गदर्शनातून तो घडला युवक..
सावंतवाडी,दि.१९: सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावातील बामणाईदेवी वाडीतील एका डोंगरावर राहणाऱ्या धनगर समाजाच्या वरक कुटुंबातील नाऊ वरक याची ही संघर्ष कथा आहे.
वरक हे धनगर समाजातील,चार शेळ्या आणि कच्च बांधकाम असलेले घर, आर्थिक अडचणी पाचवीला पुजलेल्या… अशी अत्यंत बिकट परिस्थिती,,.
अशा अत्यंत कठिण परिस्थितीत बालपण आणि शालेय शिक्षण झालेल्या नाऊ वरक या युवकाने शैक्षणिक क्षेत्रात आता मोठीच झेप घेतलेली आहे.
काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे…
माझ्या हाॅस्पिटलमध्ये झोरे आडनावाचं एक बाळ ॲडमिट होतं, बाळाला तपासून मग डिस्चार्ज देत असताना त्या बाळाच्या आईने मला एक विनंती केली “सर माझा एक भाऊ आहे, अभ्यासात हुशार आहे, होतकरू आहे, तुमच्या संस्थेतर्फे त्याच्या पुढील शिक्षणासाठी काही मदत करता आली तर प्लीज बघा”
मी ठेवणीतलं उत्तर दिलं ” त्याला येऊन मला भेटायला सांगा”
काही दिवसांनी एक उंचपुरा सावळा, काहीसा बावरलेला मुलगा मला भेटायला आला.
मी त्याला जेंव्हा विचारलं
“काय व्हायचे आहे तुला?” तेंव्हा मात्र थोडेसे आढेवेढे घेत बोलला “मला आयएएस व्हायचं आहे सर”
खरी कथा या त्याच्या उत्तरापासूनच सुरू झाली. माडखोल गावातील अनेक बामणाईदेवी सारख्या वाडीतील डोंगरावर दुर्गम भागात राहणारा एक धनगर समाजातील मुलगा म्हणतो की मला आय ए एस व्हायचंय ही गोष्टच माझ्यासाठी आश्चर्यकारक आणि कौतुकाची होती.
पण मग सुरू झाला खरा संघर्ष…मी त्याला त्याच्या मोठ्या भावाला घेऊन यायला सांगितलं.
नाऊचा मोठा भाऊ बामू हा देखील एक मेहनती आणि होतकरू तरूण पण परिस्थितीमुळे सहावीतच शिक्षण सुटलेलं आणि विधवा आई, लहान भाऊ आणि आपला संसार यासाठी शेळ्यांच्या मागे रानोमाळ फिरत जीवनाशी लढत होता.
मी जेंव्हा त्याला सांगितले की तुझ्या भावाला पुढील शिक्षणासाठी मुंबईत जावं लागेल तेंव्हा तो घाबरलाच… म्हणाला सर मुंबई नको इथेच सावंतवाडीत काय ते शिकू दे
पण हळूहळू तो तयार झाला.
मी माझ्या काही मित्रांना आणि नातेवाईकांना नाऊ बद्दल सांगितलं, अनेकांनी आपापल्या परीने आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली.
मुंबईतील रुईया महाविद्यालयात नाऊला एफवाय बीएला ॲडमिशन मिळाली.(ऑगस्ट महिना उलटून गेला असल्याने लेट ॲडमिशन मिळाली)
माझे मावसभाऊ आणि सामंत ट्रस्टचे ट्रस्टी श्री तिर्थराज सामंत यांनी मुंबईत नाऊला काय हवं नको हे पालक म्हणून बघण्याची जबाबदारी स्वीकारली.
प्रश्न होता नाऊ मुंबईत राहणार कुठे?
मालवण मधील डॉ राहुल पंतवालावलकर यांच्या वडिलांनी मुंबईतील हिंदू काॅलनीतील आपल्या फ्लॅट मध्ये नाऊची राहण्याची सोय करतो हे आश्वासन दिले आणि पुढील तीन वर्षे ते प्रेमपूर्वक निभावलं देखील….
प्रसिद्ध ह्रदय शल्य चिकित्सक डॉ अनिल तेंडोलकर, प्रसिद्ध ह्रदय रोगतज्ञ डॉ भरत दळवी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ अश्विन सामंत, माझे मामा आणि सामंत ट्रस्टचे ट्रस्टी जयप्रकाश आडेलकर, राजेंद्र फातरपेकर, बांधकाम व्यावसायिक नितीन सामंत, भावना सामंत अशा मुंबईतील अनेक दानशूर व्यक्तींनी नाऊच्या शिक्षणासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत केली.
तिर्थराज सामंत यांनी नाऊला दर महिन्याला काय हवं नको हे तर बघितलंच पण पुढील तीन वर्षे रुईया मध्ये तो काय करतो काय नाही हे जवळून पाहिलं… वेळोवेळी आर्थिक सहाय्य देखील दिलं
दादर येथील लक्ष्य अकादमी मध्ये नाऊ युपीएससीच्या कोचिंगसाठी जात होता, तेथील शिक्षकांनी आणि संचालकांनी नाऊ बद्दल सातत्याने मला त्याच्या शैक्षणिक प्रगती बद्दल माहिती देत राहिले.
महाराष्ट्र टाइम्सचे सध्याचे सहसंपादक आणि माझे मित्र समर खडस यांनी त्यावेळी लेट ॲडमिशन असल्यामुळे रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करून नाऊची ॲडमिशन तर करून दिली होतीच पण पुढील तीन वर्षे नाऊवर लक्ष देखील ठेवलं.
बीएच्या तीनही वर्षी त्याला चांगले मार्क्स मिळाले…उत्तम मार्क्सनी तो उत्तीर्ण झाला.
बीए झाल्यावर युपीएससी प्रवेश परीक्षा देण्याऐवजी त्याने देशातील प्रसिद्ध आणि पहिल्या क्रमांकावर असलेल्या जेएनयू या युनिव्हर्सिटीमध्ये एम ए साठी प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली ती कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन तो जेएनयू मध्ये दाखल झाला.
खरं तर एम ए नंतर जेएनयूमधूनच एमफिल व पीएचडी करण्याचा त्याचा मानस होता पण काही अडचणींमुळे त्याला परत गावी यावं लागलं.
पण चिकाटी मात्र त्याने सोडली नाही.
गोव्यात लाॅ काॅलेज पासून अनेक काॅलेजस् मध्ये राज्यशास्त्राचा लेक्चरर म्हणून नोकरी करत त्याने अनेक अडचणींवर मात करून राज्यशास्त्रात (पाॅलिटीकल सायन्स) गोवा युनिव्हर्सिटीमधून आता पीएचडी संपादन केली आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पीएचडी पर्यंतचे उच्च शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणऱ्या डॉ नाऊ वरक याचे डॉ . परूळेकर यांनी अभिनंदन केले.