दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्र मंडळाचा उपक्रम
कुडाळ,दि.०८: स्पर्धा परीक्षा हे सरकारी नोकरी मिळवण्याचे एक साधन असून दरवर्षी साधारणपणे महाराष्ट्रात दहा लक्ष विध्यार्थी आपले नशीब विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अजमावत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा गुणवत्ता असूनही उचित मार्गदर्शना अभावी या स्पर्धेत मागे पडतो हे आता लपून राहिले नाही. स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व संधी तसेच बदलत जाणारा अभ्यासक्रम यामुळे स्पर्धा परीक्षा हे एक आव्हान आहे आणि ते पेलायचे असेल तर योग्य मार्गदर्शन, अचूक तयारी व त्याला कष्टाची जोड या शिवाय पर्याय नाही.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा कट्टा सुरू करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. या स्पर्धा परीक्षा कट्ट्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षसाठी आवश्यक पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षाबाबत वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील दुकानवाड याठिकाणी करण्यात आली. दुकानवाड येथील पोस्टमास्तर आनंद केसरकर यांच्याजवळ दुकानवाड पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी याचा लाभ दुकानवाड पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळ मार्फत आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धा परीक्षा कट्ट्यासाठी श्रीमती योजना तावडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच सौजन्य केला त्यांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
येत्या वर्षभरात कुडाळ तालुक्यात असे स्पर्धा परीक्षा कट्टे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अथवा मदत करण्यासाठी ९८६०२५२८२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.