मॉस्को, 26 ऑक्टोबर : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान क्रेमलिनमधून मोठी बातमी येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाच्या अणुऊर्जेचा आढावा घेतला. त्यांनी त्यांच्या कार्यालयातून व्हिडिओ लिंकद्वारे आण्विक सराव पाहिला. या लष्करी सरावात अनेक प्रकारची बॅलेस्टींग आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या सराव पाहिला असल्याचे देशाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांनी सांगितले. शत्रू देशाने अण्वस्त्र हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून जोरदार अण्वस्त्र हल्ला करता यावा यासाठी त्यांनी हा सराव पाहिला.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अशा वेळी या अण्वस्त्र सरावाचा आढावा घेतला आहे, जेव्हा रशियाकडून युक्रेनवर वाढत्या युद्धादरम्यान मोठा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियावर कोणी हल्ला केल्यास त्याला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच अवलंबले जातील, असा इशारा पुतीन यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या वक्तव्याचा अण्वस्त्रांशी संबंध जोडला जात आहे.
लष्कराचा सराव
माहितीनुसार, पुतिन यांनी पाहिलेल्या अण्वस्त्रांच्या कवायतीमध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, पाणबुडीतून प्रक्षेपित केलेले सिनेवा आयसीबीएम क्षेपणास्त्र आणि Tu-95 स्ट्रॅटेजिक बॉम्ब, क्रूझ क्षेपणास्त्र यांचा समावेश होता. रशियन सैन्य जल-जमीन आणि अवकाश अण्वस्त्रांचा अभ्यास करत आहे. अशा प्रकारे लष्कराने अण्वस्त्र हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचा संदेश दिला आहे.
रशियाने माहिती दिली होती : अमेरिका
क्रेमलिनने एका निवेदनात म्हटले आहे की, सरावासाठी निर्धारित केलेले सर्व लक्ष्य साध्य करण्यात आले असून डागलेल्या सर्व क्षेपणास्त्रांनी लक्ष्य गाठले. त्याचवेळी रशियाने या सरावाबाबत आधीच माहिती दिली होती, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.