मुंबई 28 ऑक्टोबर : ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या खरेदीचं डील गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या उद्योजक एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचं डील सुरू केलं होतं. मध्यंतरी काही कारणास्तव हे पर्चेसिंग डील तात्पुरतं होल्डवर ठेवलं गेलं होतं. मात्र, आता हे डील पूर्ण झालं आहे. ट्विटर मस्क यांच्या ताब्यात जाताच सीईओ पराग अग्रवाल यांना पदावरून काढल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरत आहेत. या बातम्यांमध्ये तथ्य असल्यास अग्रवाल यांना मस्क यांच्याकडून 42 दशलक्ष डॉलर्सची भरपाई मिळेल, असं म्हटलं जात आहे.
ट्विटरच्या मालकी हक्कांमध्ये बदल झाल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल यांना जर 12 महिन्यांच्या आत काढून टाकलं गेलं तर, त्यांना अंदाजे 42 दशलक्ष डॉलर्सची भरपाई मिळेल, असं रिसर्च फर्म इक्विलरनं म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सोमवारी (24 ऑक्टोबर 22) अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 44 बिलियन डॉलर्सचा करार केला. परिणामी, ट्विटरचं 2013 पासून असलेलं सार्वजनिक कंपनी असं अस्तित्व संपुष्टात आलं. कंपनीवर मस्क यांची मालकी येताच मॅनेजमेंटमध्ये मोठे फेरबदल होत असल्याची माहिती समोर येत आहे. कारण, 14 एप्रिल रोजी दाखल केलेल्या सिक्युरिटीजमध्ये आपला ट्विटरच्या सध्याच्या मॅनेजमेंटवर विश्वास नसल्याचं मस्क म्हणाले होते.
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीचे मालकी हक्क मस्क यांच्याकडे गेल्यानंतर अनेक बदल होतील, याची सीईओ पराग अग्रवाल यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी सोमवारी टाऊन हॉल मीटिंगमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांशी याबाबत संवाद साधला होता. मस्क यांच्यासोबत डील पूर्ण झाल्यानंतर सोशल मीडिया फर्मचं भविष्य अनिश्चित असेल, अशी कल्पना अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना दिली होती. “एकदा डील क्लोज झालं की, (ट्विटर या) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं भविष्य काय असेल याची कल्पना नाही,” असं अग्रवाल म्हणाले होते.
सीईओ पराग अग्रवाल यांना पदावरून काढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यादरम्यान इक्विलरनं अग्रवाल यांना किती भरपाई मिळेल याचा अंदाज मांडला आहे. इक्विलरच्या प्रवक्त्यानं सांगितल्यानुसार, अग्रवाल यांना मिळणाऱ्या भरपाईमध्ये त्यांच्या एका वर्षाच्या मूळ पगाराचा आणि सर्व इक्विटी अॅवॉर्ड्सच्या अॅक्सलरेटेड वेस्टिंगचा समावेश असेल. मस्क यांनी ऑफर केलेली प्रतिशेअर 54.20 डॉलर्स ही किंमत आणि कंपनीच्या अलीकडील प्रॉक्सी स्टेटमेंटमधील अटींचा या भरपाईसाठी विचार केला जाईल. ट्विटरच्या प्रतिनिधीने इक्विलरच्या अंदाजावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी असलेल्या पराग अग्रवाल यांची नोव्हेंबर 2021मध्ये सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ट्विटरच्या प्रॉक्सीनुसार, 2021मध्ये त्यांची एकूण भरपाई रक्कम 30.4 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. आता त्यामध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान, कंपनीचे मालकी हक्क मिळवल्यानंतर एलॉन मस्क स्वत: प्रश्न-उत्तराच्या सत्रासाठी ट्विटर स्टाफसमोर येतील, असं कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे.