सावंतवाडी,दि.०९: देशाचे माजी संरक्षण मंत्री, सर्वाधिक वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवणारे लोकनेते खा. शरदचंद्रजी पवार यांच्याविषयी माजी खासदार असून देखील बेजबाबदारपणे निलेश राणे यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते.
देशाच्या व राज्याच्या जडणघडणीत आदरणीय पवार साहेबांचे बहुमोल योगदान आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण, संरक्षण, कृषी, सहकार, आय. टी., दळणवळण अशा आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये पवार साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची महती सांगणारं कितीतरी साहित्य बाजारात उपलब्ध आहे.
निलेश राणे यांचे वडील, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आदरणीय पवार साहेबांचा अनेक कार्यक्रमांमध्ये जाहीर सन्मान तर केलाच, सोबत कित्येक वेळा अनेक माध्यमांमध्ये आदराने उल्लेख करत आले आहेत. ‘लोक माझे सांगाती’ या आदरणीय पवार साहेबांच्या चरित्रात त्यांच्या विकासकार्याचा आणि राजकीय कारकीर्दीचा अभ्यासपूर्ण आढावा घेता येऊ शकतो. त्यातून शिकण्यासारख्या अनेक बाबी आहेत. माजी खा. निलेश राणेंना हेच लक्षात आणून देण्यासाठी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाची एक प्रत माझ्या वतीने मोफत देत आहे.
किमान आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विषयीचे नारायण राणे यांचे मत, साहेबांविषयीचे उपलब्ध साहित्य, तसेच आम्ही पाठवलेलं पुस्तक हे वाचले तरी अशी बेजबाबदार वक्तव्य ते भविष्य काळात करणार नाहीत. असे माझे मत आहे.
असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी माजी खासदार निलेश राणे यांना शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेले पुस्तक स्पीड पोस्टाने आज राणे यांना पाठविले.