डेगवे शासकीय जंगलात खैरतोड गुन्ह्यात फरार आरोपी सुदिन श्रीराम आगरवडेकर याचा अटकपूर्व जामीन नामंजूर…..!

0
152

ओरोस,दि.०८: डेगवे येथील शासकीय जंगलात खैरतोड करून घटनास्थळावरून वनअधिकाऱ्यांना चकमा देऊन फरार झालेल्या आरोपी सुदीन श्रीराम आगरवडेकर,वय -१९ वर्षे, रा.तळवडे, ता.सावंतवाडी याने अटकपूर्व जामीनासाठी ओरोस येथिल सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.
त्याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गुप्तबातमी वरून फरार आरोपी सुदिन श्रीराम आगरवडेकर व त्याचे इतर दोन साथीदार यांना डेगवे येथील शासकीय जंगलात कटरच्या सहाय्याने तोड करून खैर वाहतूक करताना पकडण्यासाठी वन विभागाकडून सापळा लावण्यात आला. दिनांक १८ मे रोजी या तिघांपैकी एक साथीदार महेश कुडव, वय-१८ वर्षे, रा.इन्सुलि याला रंगेहाथ पकडण्यात आले तर सुदीन आगरवडेकर व त्याचा दुसरा साथीदार मंथन आईर, वय-१६ वर्षे, रा.वाफोली हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. या दोन फरार आरोपींपैकी मंथन आईर हा आरोपी दिनांक २४ मे रोजी स्वतःहून वन अधिकारी यांचे समक्ष तपासात सहकार्य करणेकामी हजर झाला परंतु दुसरा फरार आरोपी सुदिन श्रीराम आगरवडेकर हा आजतागायत फरार आहे. त्याने ओरोस सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्याची सुनावणी होऊन मा.जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी फरार आरोपीवर ताशेरे ओढत त्याचा जामीनअर्ज फेटाळून लावला. अद्याप आरोपीने लपवून ठेवलेले वाहन व खैर माल मिळून आला नसल्याने तसेच आरोपी यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू तस्करीच्या गुन्ह्यात देखील आरोपी असल्याचे वन विभागाकडून या सुनावणी दरम्यान मा.न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या सुनावणी दरम्यान वन विभागाची बाजू तपास अधिकारी तथा सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व सरकारी वकील श्री. रूपेश देसाई यांनी प्रभाविपणे मांडली. तर आरोपीच्या वतीने सावंतवाडीचे वकील श्री.पंकज आपटे यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here