मुंबई, 31 ऑक्टोबर: टीम इंडियाची नजर सध्या टी20 वर्ल्ड कपवर आहे. तीन पैकी 2 सामने जिंकून टीम इंडिया सध्या सेमी फायनलच्या उंबरठ्यावर आहे. सुपर 12 फेरीत भारताचे अजून दोन सामने बाकी आहेत. पण याच दरम्यान बीसीसीआय एका वेगळ्या तयारीला लागली आहे. कारण वर्ल्ड कप संपताच लगेच पाच दिवसांनी टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा सुरु होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीकडून आज टीम जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
चेतन शर्मा करणार टीमची घोषणा
बीसीसीआयचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा आजच भारतीय संघाची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. टीम इंडियाच्या या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ 3 टी20 आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. दरम्यान टी20 वर्ल्ड कपची फायनल 13 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 18 नोव्हेंबरला न्यूझीलंड दौऱ्यातील पहिली टी20 खेळवली जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.